फलटण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश आले असले तरी आगामी काळात तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क राहून योग्य नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या.
फलटण येथे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे, शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रावळ, बरड पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘कोरोना संक्रमण नियंत्रणात आले असले तरी धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे शासन नियमांचे पालन करून कोरोना वाढणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे. कोणत्याही गावात सापडलेला बाधित व्यक्ती एकतर रुग्णालयात दाखल करा किंवा संस्थात्मक विलगीकरणात पाठवा; परंतु कोणीही गृहविलगीकरणात असणार नाही यासाठी विशेष खबरदारी घ्या. संस्थात्मक विलगीकरणात येण्यास कोणी नकार दिल्यास प्रसंगी पोलिसांची मदत घ्या; कोणालाही गृह विलगीकरणात ठेवू नका.
२०० बेडचे जम्बो कोरोना रुग्णालय उभारण्याबाबत तातडीने निर्णय घेऊन कोणतेही रुग्णालय येत्या पंधरा, वीस दिवसांत उभे राहील असे नियोजन करा. सध्या ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेली कोरोना केअर सेंटर्स, कोरोना उपचार केंद्र आज रुग्ण नाहीत म्हणून लगेच बंद करू नका, अशा सूचना रामराजे यांनी दिल्या. प्रारंभी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी तालुक्यातील आतापर्यंतचे एकूण बाधित, त्यापैकी उपचार होऊन बरे झालेले आणि अद्याप उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या, लसीकरण सद्यस्थिती, सध्या शहर व तालुक्यात सुरु असलेले कोरोना टेस्टिंग व लसीकरण याबाबत सविस्तर माहिती दिली.
(चौकट)
लहान मुलांसाठी ५० बेडचे रुग्णालय
तिसऱ्या लाटेत लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. त्यामुळे लहान मुलांसाठी स्वतंत्र यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टर्स, उपचाराची साधने, सुविधा उपलब्ध करुन लहान मुलांसाठी किमान ५० बेडचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची आवश्यकता आहे. याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बैठकीत दिल्या.
फोटो : १६ रामराजे
फलटण येथे बुधवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कोरोना परिस्थितीची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. (छाया : नसीर शिकलगार)