फलटण : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले तातडीने माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी फलटण-पुणे राष्ट्रीय महामार्ग सुरवडी (ता. फलटण) येथे रोखून चक्काजाम करण्यात आला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी ऊर्जामंत्री तसेच सरकारचा रास्ता रोको करून जाहीर निषेध केला.
यावेळी महामुलकर म्हणाले, आम्ही गेल्या वर्षापासून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले माफ करा, अशी मागणी करत आहोत. मात्र, राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. मंत्र्यांचे बंगले सजवायला यांच्याकडे पैसे आहेत. मात्र सर्वसामान्यांना वीजबिलात सवलत द्यायला पैसे नाहीत. लॉकडाऊनची भीती घालून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा राज्यभर तीव्र पडसाद उमटतील, असा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी दिला. तसेच महावितरणने घरगुती व कृषीपंप वीजतोडणी थांबवावी नाहीतर संघर्ष अटळ आहे, असाही इशारा दिला
यावेळी डॉ. रवींद्र घाडगे, सचिन खानविलकर, प्रमोद गाडे, दादा जाधव, सुभाष जाधव, बाळासाहेब शिपकुले, रोहन मोहिते, सचिन बारगळे, विक्रम धायगुडे, रोहन चव्हाण, अजित जाधव, उमेश घाडगे, परेश बोडरे, अक्षय लोंढे, निखिल नाळे, प्रल्हाद अहिवळे, मधुकर गाढवे, विश्वनाथ यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
१९सुरवडी(ता. फलटण) येथे रास्ता रोको आंदोलन करताना धनंजय महामुलकर, नितीन यादव, सचिन खानविलकर आदी.