औंध : ‘एफआरपी’चे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आडून केला असून, त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे यांनी रविवारी दिली.
माहिती देताना घार्गे म्हणाले, ‘ऊस उत्पादकांची १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर मिस्डकॉल मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेतून मिळालेला डेटा सुप्रीम कोर्टात या व्यापक कटाविरोधात वापरण्यात येणार आहे.
या निर्णयानुसार साठ टक्के रक्कम ऊस तुटल्यानंतर १५ दिवस ते १ महिन्यात, २० टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यावर व उर्वरित २०टक्के रक्कम पुढील गळीत हंगाम सुरू झाल्यावर मिळणार आहे.
शेतकऱ्यांचे एकरकमी एफआरपीचे कायदेशीर कवचच शासन काढून घेत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या लढ्यात उतरणे आवश्यक आहे. शेतकरी मोठ्या आशेने उसाचे पीक घेऊ लागला आहे, त्यावर त्याचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. या पद्धतीने तुकडे होऊन घामाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही.
आता लढा दिला नाही तर ऊस उत्पादकांचे भविष्य अंधारात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मिस कॉल द्यावा, असे आवाहन घार्गे यांनी केले आहे.
कोट..
शेतकऱ्यांना जर उसाचे पैसे तीन टप्प्यांत घ्यावे लागतील तर बँकांच्या कर्जाचे हप्ते, दवाखान्यातील बिल, विजेचे बिल, मोबाईल रिचार्ज यांसह अनेक गोष्टींचे तीन टप्पे शेतकऱ्यांनी पाडले तर चालतील का? शेतकऱ्यांची गळचेपी बंद करा, हीच आमची मागणी आहे.
- दत्तात्रय घार्गे, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी