प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय आणि बँका व प्रशस्त बाजारपेठ यामुळे अलीकडे तळमावलेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. काळगाव, धामणी, गुढे, खळे, कुठरे, कुंभारगाव, मानेगाव, साईकडे, गलमेवाडी, काढणे, आदी गावांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून तळमावले बाजारपेठेकडे पाहिले जाते.
सुमारे तीनशेहून अधिक छोटे-मोठे व्यावसायिक येथे व्यापाराच्या निमित्ताने परगावाहून या बाजारपेठेत उदरनिर्वाहासाठी येतात. मात्र, अलीकडे काही दिवसांपासून येथे मद्यपींसह सैराट दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढेबेवाडी पोलिसांनी गत अनेक दिवसांपासून कडक कारवाईचा बडगा उगारूनसुद्धा सैराट दुचाकीस्वारांवर काहीच परिणाम होत नाही. उलट सायलेंसरची पुंगळी काढून मोठ्या आवाजात रेस करत संपूर्ण बाजारपेठेला लक्ष करणाऱ्यांवर केवळ दंडाची कारवाई नको, तर गुन्हे दाखल करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होऊ लागली आहे.