महाबळेश्वर : प्रयत्न करूनही कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नसल्याने राज्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या दोन दिवसांत याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी महाबळेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
महाबळेश्वर ठाण्यातील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सोमवारी महाबळेश्वर पोलीस ठाण्यास भेट देऊन येथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
बाधित कर्मचाऱ्यांची माहिती देताना पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांनी सांगितले की, येथील सर्वच कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला दिसत असलेल्या लक्षणांबाबत लवकर माहिती दिली नाही तरीदेखील सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शहरातून फेरफटका मारून लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिक किती पालन करतात, याची माहिती घेतली. त्यांनी पोलीस ठाणे ते सुभाष चौक असा फेरफटका मारला. यावेळी काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. तेथील दुकानदारांची बन्सल यांनी भेट घेऊन त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
‘अनेक प्रयत्न करूनही कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही ‘ब्रेक द चेन’साठी लॉकडाऊन लागू केला, तरी कोरोना नियंत्रणात येत नाही. त्यामुळे कडक लॉकडाऊन लावण्याबाबत वरिष्ठ पातळीवर विचारमंथन सुरू आहे. लवकरच याबाबत घोषण केली जाण्याची शक्यता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली.