कऱ्हाड : कोपर्डे हवेली येथील वाळू ठेकेदार संदीप शिवाजी चव्हाण (वय ३२) याने सैदापूर येथील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आर्थिक व्यवहार किंवा अन्य एका कारणास्तव संदीपने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक पोलीस तपासात समोर येत आहे. कोपर्डे हवेली येथील संदीप चव्हाण हा युवक वाळूचे ठेका घेत होता. बुधवारी रात्री तो मद्यप्राशन करून सैदापूर येथील सूर्या लॉजमध्ये गेला होता. त्या ठिकाणी त्याने रात्रीच्या मुक्कामसाठी रूम मागितल्यानंतर लॉज व्यवस्थापक अजय पाटील यांनी त्याला लॉजमधील २०६ क्रमांकाची खोली भाडेतत्त्वावर दिली. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संदीप रूममध्ये झोपण्यासाठी गेला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत संदीपने त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने व्यवस्थापक अजय पाटील यांनी रूमचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून संदीपने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे व्यवस्थापक पाटील यांनी बाहेरून धक्के देऊन दरवाजा उघडला. त्यानंतर चव्हाण याने बेडसीट फाडून त्याच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत व्यवस्थापक पाटील यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. संदीपच्या आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र, आर्थिक व्यवहार किंवा अन्य एका कारणातून ही आत्महत्या झाली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. तपास पूर्ण झाल्याशिवाय आत्महत्येमागचे नेमके कारण सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाळू ठेकेदाराची लॉजमध्ये आत्महत्या
By admin | Updated: April 25, 2015 00:01 IST