कऱ्हाड : तालुक्यातील काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था झाली असून, ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत. ते बदलण्याच्या वीजवितरण कंपनीतील अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करून देखील त्यांच्याकडून त्याची दखल घेतली जात नसेल तर तक्रार निवारण सप्ताह कशासाठी राबवायचा, अशा शब्दात वीजवितरण कंपनीच्या अधिकांऱ्यांवर पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांसह सभापतींनी ताशेरे ओढले. तालुक्यातील नव्याने बांधकामासाठी मंजूर असलेल्या अंगणवाडीचे बांधकाम मोकळ्या जागेत करावे, असा ठराव सभागृहात घेण्यात आला. कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. तर उपसभापती विठ्ठलराव जाधव, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. सभेदरम्यान वीजवितरण कंपनीतील अधिकारी डोंगरे यांनी विभागाचा आढावा सादर केला. आढाव्यादरम्यान सदस्य भाऊसाहेब चव्हाण, राजेंद्र बामणे, लक्ष्मण जाधव, अनिता निकम यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. फेब्रुवारीमध्ये जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलण्याची सहा महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांकडे मागणी केली, तसेच किवळ येथील ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी तीन महिने सभागृहात हा विषय मांडला असता अधिकाऱ्यांकडून लक्ष दिले जात नसेल तर अधिकारी नक्की कुणाच्या आदेशाने काम करत आहेत, असा सवाल सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला. वीजवितरण कंपनी ही अधिकाऱ्यांच्या हातात राहिलेली नसून ती कंत्राटदारांच्या हातात आहे. कामांच्या बाबतीत कंत्राटदारच अधिकाऱ्यांवर साहेब झाले आहेत, अशा शब्दात सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली.आटके येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे पाण्याअभावी झालेल्या नुकसानीबाबत मागील सभेत विषय मांडून देखील अद्याप वीजवितरण अधिकाऱ्यांकडून काहीच पाठपुरावा केला जात नसल्याचे सदस्य राजेंद्र बामणे यांनी सभागृहास माहिती दिली. वीज खांब व कनेक्शनची कामे पूर्ण न करणाऱ्या एजन्सीमधील कंत्राटदारांने २३ रोजी होणाऱ्या आमसभेत हजर राहण्यास सांगावे, अशा उंब्रज विभागाच्या आढाव्यावेळी अधिकारी डोंगरे यांना सभापती देवराज पाटील यांनी अशा सूचना केल्या. तर उपसभापती विठ्ठल जाधव यांनी तालुक्यातील बांधकामाची मंजुरी मिळालेल्या अंगणवाडीच्या इमारती ग्रामपंचायतींच्या मोकळ्या जागेत बांधण्यात याव्यात, असा ठराव मांडला. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आरळेकर यांनी आढावा सादर केला. म्होप्रे येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळेवर बिल दिले जात नसल्यामुळे येथील काम संथगतीने सुरू असल्याचे उपअभियंता आरळेकर यांनी सभागृहास माहिती दिली. पाणीपुरवठा विभागाने विरवडे येथील औद्योगिक कंपनीकडून पाण्याची वसुली तत्काळ करावी, अशा सभापती देवराज पाटील यांनी उपअभियंता आरळेकर यांना सूचना केली. यावेळी तालुका कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, शेती विभाग, लघुसिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आढावा सादर केला. (प्रतिनिधी) अगोदर अभिनंदनाचा ठराव...मागील पंचायत समितीच्या सभेत उपजिल्हा रुग्णालयातील चांगल्या कामाबाबत पंचायत समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. मात्र, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तसेच कर्मचारी यांच्याकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीबाबत समाधानकारक परिस्थिती दिसून आली नाही. त्यामुळे यावेळच्या सभेत अधिकाऱ्यांच्या कामकाजावर तक्रारींचा ठराव मांडावा का, असे सदस्य लक्ष्मण जाधव यांनी सभागृहात सांगितले.
‘वीज’वितरण अधिकाऱ्यांवर सदस्यांचे ताशेरे
By admin | Updated: May 22, 2015 00:21 IST