सातारा : महाविद्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडणाऱ्या ‘लल्लन बॉईज’ टोळीला कडाडून विरोध करण्यासाठी महाविद्यालयातून तरूणांचे ग्रुप पुढे सरसावले आहेत. अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा दोषी असतो हे लक्षात घेऊन आता या झुंडशाहीला विरोध करण्यासाठी तरूणाईची शक्ती एकवटली आहे.यशवंतराव चव्हाण, शिवाजी कॉलेज आणि धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय परिसरात ‘लल्लन बॉईज’ या भुरट्या टोळक्याने गँग सुरू केली होती. हुकूमशाही पध्दतीने सुरू असलेल्या त्यांच्या बाललीला ‘लोकमत’च्या माध्यमातून सर्वांसमोर आल्यानंतर महाविद्यालयीन तरूणांना आधार मिळाला आहे. इतके दिवस हा विषय कोणाशी, कसा बोलायचा या संभ्रमात असणाऱ्या तरूणाईने आज ‘लोकमत’शी संवाद साधून याविषयी भूमिका स्पष्ट केली.महाविद्यालय परिसरात या टोळक्याने जर कोणाला त्रास दिला तर त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा संकल्प या तरूणांनी केला आहे. विशेष म्हणजे यात तरूणींनीही पुढे येण्याची तयारी दर्शविली आहे. झुंडशाहीविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज झालेल्या तरूणांना आता प्रतीक्षा आहे सर्वांच्या सहभागाची. भिणाऱ्यालाच भीती दाखविणाऱ्या टोळीला रोखठोक उत्तर मिळाले तर टोळी तिथल्या तिथे संपू शकते, या भावनेतून विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. साध्या वेशातील पोलीस काही दिवस महाविद्यालय परिसरात तैनात केले गेले तर दहशत माजवणाऱ्यांना आळा बसू शकतो. (प्रतिनिधी)महाविद्यालय परिसरात गावगुंडाची एंट्रीलल्लन बॉईजच्या विरोधात गुरूवारी संध्याकाळी एका मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याविषयीचा राग मनात खदखदत असतानाच या बॉईजच्या कारनाम्यांचा पाढा ‘लोकमत’ मध्ये वाचल्यानंतर एका गावगुंडाला भयंकर संताप आला. एका चारचाकीतून आपल्या गोतावळ्यासह महाविद्यालय परिसरात दाखल झालेल्या या गल्लीदादाने ‘गांधीगिरी’ करत तक्रार दाखल करणाऱ्याची भेट घेतली. ‘मला गुन्ह्यांची चिंता नाही. माझ्यावर दीडशे गुन्हे आहेत. अजून एक-दोन गुन्ह्यांनी फरक पडणार नाही. तक्रार मागे घेऊ नका. मी तुमच्या पाठीशी आहे,’ असा गर्भित सल्ला दिला आणि तिथून निघून गेला.हवालदाराच्या मुलाला आठवड्यातून एकदा मारलल्लन बॉईजच्या करामती एकेक करून समोर येऊ लागल्या आहेत. एका पोलीस हवालदाराच्या मुलाला गतवर्षी या गँगने भयंकर त्रास दिला होता. कुठल्याशा कारणामुळे या टोळीबरोबर त्याचे वाद झाले. लगेच या ‘टिंग्या’नं त्या मुलाला बोलावून घेतले. ‘तू दर आठवड्याला आमचा मार खायचा. जिथे दिसशील आणि ज्याच्यासोबत असशील त्याच्यासमोर तुला मारणार,’ असा आदेश याने सोडला. भेदरलेल्या अवस्थेत या मुलाने घर गाठले. वडील पोलिसात असल्यामुळे त्याने याविषयी त्यांना सांगिंतले. पण तेही काही करू शकले नाहीत. खुद्द पोलीस हवालदारच या जाचातून मुलाला कसे सोडवता येईल, याविषयी हतबलपणे सल्ले घेत होते.बघताय काय, ठोकून काढा : शशिकांत शिंदेमहाविद्यालयांमध्ये त्रास देणारा कोणीही ‘लल्लन’ असो किंवा ‘फल्लन’ असो, त्याला सरळ उचलून आत टाका आणि ठोकून काढा. बघ्याची भूमिका घेऊ नका, असा आदेश पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजीव मुठाणे यांना दिला. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना कुणी त्रास देत असेल तर बघ्याची भूमिका घेऊ नका. त्यांना उचलून आत टाकून ठोकून तर काढाच; त्याचबरोबर कपडे काढून गर्दीसमोर चांगला चोप द्या. तो कोणत्या पक्षाचा आहे अथवा कोणत्या दादाचा मुलगा आहे, हे बघू नका. पोलिसांनी कोणत्याही हस्तक्षेपाला न जुमानता काम करावे आणि विद्यार्थ्यांनीही थोडे धाडसी बनावे.’बचावासाठी थेट महाविद्यालयात राडाकाही दिवसांपूर्वी येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील एका तरूणीला या टिंग्याने अश्लील ‘एसएमएस’ केला. याविषयी संबंधित तरूणीने आपल्या आईला माहिती दिली. संबंधित क्रमांकावर फोन केल्यानंतर तो नंबर या गँगच्या म्होरक्याचा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ती आई महाविद्यालयात दाद मागायला प्राचार्यांकडे गेली. याविषयीची माहिती घेतल्यानंतर प्राचार्यांनी म्होरक्यालाही बोलावून गेले. मात्र, त्यावेळी त्याच्यासमवेत सुमारे पंधरा ते वीस महिला होत्या. त्या सगळ्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यामुळे उपस्थित सर्वच जण अवाक झाले.
गुंडांच्या विरोधात विद्यार्थिनींचा ‘इन्कलाब’
By admin | Updated: August 22, 2014 22:06 IST