वाठार स्टेशन : ‘आई-बाबा यंदा आम्हाला फटाके नकोत ..आम्ही फटाके नाही वाजवणार? फटाक्यामूळे ध्वनी प्रदुषण होते पर्यावरणाचे संतुलन बिघडते आणी पैसा ही वाया जातो. फटाक्यावर होणारा हा खर्च टाळताना आमच्याच शाळेतील अनेक गरजुंना आम्ही या पैशांची मदत करणार आहोत,’ अशी प्रतिज्ञा घेत यंदाची दिवाळी फटाकेमक्त साजरी करण्याचा निर्धार देऊर, ता. कोरेगाव येथील श्री मुधाई हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या शेकडो मुलांनी केला आहे.राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम साजरे होतात. या मध्ये वृक्षारोपण, वाढदिवसाला वृक्षभेट, पक्षांना चारा पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, इको फ्रेंडली होळी, गणपती मूर्ती दान असे विविध उपक्रम गेली अनेक वर्षांपासून राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून यावर्षीची दुष्काळी परस्थिती विचारात घेऊन व फटाक्यासारख्या वस्तुवर होणारा नाहक खर्च टाळण्यासाठी तसेच ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी मुलांनी फटाके वाजवू नये याबाबत राष्ट्रीय हरित सेनेचे मार्गदर्शक, समन्वयक वृक्षमित्र प्रकाश कदम यांनी या मुलांना या उपक्रमाबाबत माहिती दिली. तसेच याबाबत मुलांनीही आम्ही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करू असा निर्धार व्यक्त करीत शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. यावेळी व्ही. बी. गायकवाड, पुणे विभाग पतसंस्थेचे संचालक मनेश धुमाळ, इ. एस. कोकरे उपस्थित होते. (वार्ताहर)
फटाकेमुक्त दिवाळीचा विद्यार्थ्यांचा निर्धार
By admin | Updated: November 4, 2015 00:09 IST