पाटण : पांढरेपाणी, ता. पाटण या गावातील रस्त्यावर विजेच्या खांबावरील दिवे बंद आहेत. बंद असलेल्या या दिव्यांमुळे पांढरेपाणी गावात सायंकाळनंतर अंधार असतो. तर असणारे दिवेही उशिरा लावले जात आहेत. विजेचे दिवे लावण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे.
तलाव कोरडे
शामगाव : कऱ्हाड तालुक्यात शामगाव विभागातील तलावांची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शामगाव विभाग दुष्काळी आहे. दरवर्षी येथील अनेक गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावतो; मात्र प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. सध्या पाणी पातळी खालावल्याने येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागणार आहे.
उन्हाचा तडाखा
कऱ्हाड : कऱ्हाड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे या वाढलेल्या तापमानाचा नागरिकांना चांगलाच चटका बसत आहे. यावेळी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला. या तापलेल्या वातावरणाचा त्रास शेतकरी तसेच नागरिकांना होताना दिसत आहे.
श्वानांचा उपद्रव (फोटो : २२इन्फो०२)
तांबवे : विजयनगरसह परिसरात मोठ्या संख्येने मोकाट श्वानांचा वावर आहे. त्याचा गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ तसेच दुचाकीस्वारांतून होत आहे.
ऊसतोडींना वेग (फोटो : २२इन्फो०१)
तांबवे : विभागातील ऊसतोडणीने वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी मजुरांनी आपल्या झोपड्या घातल्या आहेत. पहाट होताच हे मजूर शिवाराचा रस्ता धरत आहेत. तसेच दिवसभर ऊसतोड करत रात्री लवकर परतत आहेत. शिवारात ऊस तोडीची लगबग सुरू असल्यामुळे शेतकरीही सकाळी लवकर शिवारात जात असून पुढील हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात ते व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.