बाळासाहेब रोडे -- सणबूर --ढेबेवाडी विभागातील डोंगरदऱ्यात वसलेल्या भोसगाव-आंब्रुळकरवाडी गावाला पाणीपुरवठा करणारे पाण्याचे स्रोत आटल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून भटकंती करावी लागत आहे. बायका-मुलांचा जीव धोक्यात घालून ग्रामस्थ खोल दरीत उतरुन पायथ्याला असलेल्या झऱ्यातील पाणी भरावे लागत आहे.ढेबेवाडीपासून अवघ्या काही अंतराव भोसगाव ग्रामपंचायतीअंतर्गत पश्चिमेस आंब्रुळकरवाडी डोंगराच्या कुशीत वसलेली आहे. या गावची लोकसंख्या सुमारे सहाशे आहे. या गावातील बहुतांशी लोक कामधंद्यासाठी पुणे-मुंबईत आहेत. गावची यात्रा, लग्न सोहळा, उन्हाळी सुटी, सण यासाठी चाकरमानी गावाकडे येतात. ही वस्ती डोंगरात वसल्यामुळे पाणीटंचाई कधीही जाणवत नव्हती. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाऊस कमी पडत असल्यामुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.आंब्रुळकरवाडी डोंगरावर असल्यामुळे भोसगाव नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी तेथे पोहोचत नाही. येथील लोकांना पाणी मिळावे, यासाठी डोंगरातील पाण्याच्या स्रोतांवर चेंबर बांधले आहेत. दोन-तीन किलोमीटर परिसरातून पाणी आणावे लागत आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे पाण्याचे स्रोतही आटू लागले आहेत.या गावाचा पाणीप्रश्न कायमचा मिटावा, यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे गाऱ्हाणे मांडले; पण प्रश्न जैसे थे राहिला आहे. प्रशासनाने याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. पाण्यासाठी आम्हाला रात्रंदिवस डोंगरदऱ्यात भटकावे लागत आहे. वन्यप्राण्यांची भीती असते. पण करणार काय? प्रत्येक वर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शासनाने आमचा पाणीप्रश्न सोडवावा.- तानाजी आंब्रुळकर, नागरिकझऱ्यांचा शोध सुरू...गावातील कूपनलिका, विहिरीचे पाणी आटल्याने ग्रामस्थांना डोंगर परिसरातील झरे शोधत हिंडावे लागत आहे. जीव धोक्यात घालून झऱ्यातील पाणी भरावे लागत आहे. छोट्या भांड्याने घागरी भराव्या लागत आहेत. पाण्यासाठी झऱ्यावर रांगा लागत आहेत. तासन्तास पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे.पाणीटंचाईमुळे चाकरमानी शहरात परतलेसण समारंभ, लग्न सोहळा, यात्रा यासाठी गावी आलेले चाकरमानी पिण्याचे पाणी नसल्यामुळे पुन्हा शहराकडे परतू लागले आहेत. सुटीसाठी आलेल्या चाकरमान्यांनाही पाण्यासाठी डोंगरकपारीतून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पाण्याच्या शोधासाठी डोंगरदऱ्यातून पायपीट!
By admin | Updated: March 15, 2016 00:39 IST