मायणी : कोट्यवधी रुपये खर्च करून खटाव तालुक्यातील पडळ व गुरसाळे येथे उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. त्यामुळे लोकांचे हकनाक बळी जात आहेत. येत्या चार दिवसांत तेथे कोरोना केअर सेंटर सुरू न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी दिला आहे.
गुदगे म्हणाले, गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच येथील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर अशी दोन्ही केंद्र निर्माण करण्यात आली होती. परिणामी खटाव तालुक्यातील कोरोना बाधितांवर वेळेत उपचार होऊन लोकांना दिलासा मिळत होता. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाची लाट नव्हे, तर त्सुनामी आलेली असतानाही कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले नाही.
तालुक्यातील तरसवाडी ते औंधदरम्यानच्या पन्नास किलोमीटरच्या पट्ट्यात एकही कोरोना केअर सेंटर नाही. त्यामुळे उपचारासाठी लोकांना सांगली, कोल्हापूर व पुणे या परजिल्ह्यांत जावे लागत आहे. मात्र, तेथेही बेड उपलब्ध होत नसल्याने उपचाराअभावी लोकांचे हकनाक बळी जात आहेत. त्यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी वारंवार चर्चा करण्यात आली आहे.
तालुक्यात कोरोना केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे. पडळ व गुरसाळे ( ता. खटाव ) येथे चार - चार कोटी रुपये खर्चून सर्व सोयी-सुविधांनीयुक्त अशी प्राथमिक आरोग्य केंद्रे बांधण्यात आली आहेत.
त्या आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्यास प्रशासनाने हिरवा कंदीलही दाखवला आहे. त्याअनुषंगाने जबाबदार अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधून कार्यवाहीबाबत मी स्वतः पाठपुरावा करीत आहे. मात्र, ठोस निर्णय न घेता त्यांचे केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत, वेळकाढूपणा करण्यात येत आहे. नुसतेच, केंद्र यादीला घेतले आहे. त्यासाठी नोडल ऑफिसर नेमले आहेत. अशा प्रकारची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून वडूज खटाव व औंध या ठिकाणी एकही बेड उपलब्ध नाही. प्रशासनाने आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन, लोकांच्या जीवाशी न खेळता तातडीने कोरोना केअर सेंटर सुरू करावे. येत्या चार दिवसांत प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्वाणीचा इशारा सुरेंद्र गुदगे यांनी दिला आहे.
चौकट
खटाव तालुक्यात तातडीने कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी जातीने लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावेत, अशी मागणीही सुरेंद्र गुदगे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.