महाबळेश्वर : ‘कोकणातील लाल दगडाचा वापर करून वेण्णा लेक येथील बोट क्लब व परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्यावर पालिकेचा भर असून, सुशोभीकरणाचे हे काम पूर्ण झाल्यानंतर वेण्णा लेकच्या लुकमध्ये चांगलाच बदल झालेला दिसेल,’ अशी माहिती नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.सध्या येथे उन्हाळी हंगाम सुरू आहे. वेण्णा लेक येथील नौकाविहार हे आबालवृद्धांचे मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे नौकाविहारासाठी पर्यटकांची येथे नेहमी झुंबड उडताना दिसते. तिकीट खिडकीवर रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. रांगेत तिकीट मिळेपर्यंत कुटुंबातील इतरांना येथे थांबावे लागते, तसेच काही मंडळी नौकाविहाराऐवजी येथील लेकचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी बराच वेळ बसून राहतात. तरुणाई वेण्णा लेक व तेथे सुरू असलेल्या नौकाविहाराचे फोटो काढण्यात मग्न असतात. अशा विविध प्रकारच्या पर्यटकांना येथे कोणतीही असुविधेला सामोरे जावे लागू नये म्हणून पालिका व एका खासगी कंपनीच्या वतीने येथे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल या माहिती देताना म्हणाल्या, ‘सुशोभीकरण करताना महाबळेश्वर येथील पर्यावरण व पारंपरिक निसर्ग सौंदर्यालया गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. लाल दगडात पाथ-वे बैठक व्यवस्था, पायरी संरक्षक भिंत आदी बांधकाम करण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यालगत फूटपाथ शेजारी ही दगडी पाथ-वे तयार करण्यात येणार आहे. येथे वेगळ्या पद्धतीचे विद्युत दिवे लावण्यात येणार आहेत. या प्रकाशामध्ये रात्री देखील पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता येणार आहे. येथे असलेल्या घोड्यांची लिदही काही प्रमाणात पाण्यात जाण्याची शक्यता आहे, त्याबाबतही उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी व्यावसायिक सहकार्य करीत असल्याचेही तोष्णीवाल यांनी सांगितले.नगरसेवक संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वेण्णा लेक सुशोभीकरण करण्याच्या कामाला प्रारंभ
By admin | Updated: May 11, 2015 23:26 IST