पळशी : माण तालुक्यातील मार्डी-म्हसवड रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दयनीय अवस्था झाली असून, वारंवार मागणी करूनही संबंधित विभाग कानाडोळा करीत आहे. पावसाने हा रस्ता जागोजागी उखडला तर आहेच; पण ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची मालिका सुरू असून, या मार्गावरून प्रवास करताना ‘अंगाचा खिळखिळा नि वाहनांचा खुळखुळा’ होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी गेल्या वर्षभरापासून होत आहे.
फलटण-शेनवडी या रस्त्याचा भाग असलेला मार्डी-म्हसवड हा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला असून यापैकी म्हसवड ते वरकुटे हा भाग तर अती पावसामुळे अनेक ठिकाणी खचून वाहतुकीत अडथळा ठरत आहे. दररोज प्रवास करणाऱ्यांना मणक्यांचे विकार सुरू झाले आहेत.
या रस्त्यावरून मुंबई, ठाणे, पुणे, फलटण, बारामती, आटपाडी, सांगोला, जत या भागात जाणाऱ्या एसटी बसेस व खासगी वाहनांमधून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. तर संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शंभू महादेव दर्शनासाठी शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी याच रस्त्यावरून भाविकांना प्रवास करावा लागतो. खराब झालेल्या रस्त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या साईडपट्ट्या गेल्या दहा वर्षांत भरल्या नसल्याने डांबरीकरण केलेला भाग व साईडपट्टी यामध्ये अनेक ठिकाणी एक फुटापर्यंतचे अंतर पडले आहे. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहणे घसरून दररोज अपघात होत आहेत. यामुळे प्रवाशांच्या हातपाय मोडण्याबरोबरच डोक्याला मार लागण्यामुळे अनेक प्रवासी जायबंदी होत आहेत. वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देण्यावरून वाहनचालकांमध्ये भांडणेही होत आहेत. अनेकवेळा या रस्त्यावर लहान-मोठे अपघातही झाले आहेत. या मार्गाची दुरुस्ती व्हावी यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेकवेळा आवाज उठविण्यात आला. त्याचप्रमाणे या भागातील काही राजकीय नेत्यांनीही पाठपुरावा केला. त्यानंतर या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, दोनच दिवस काम केल्यानंतर हे काम बंद करून ठेकेदाराने पोबारा केला आहे.
कोट..
या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, आता तरी संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी व प्रवाशांचे हाल थांबवावेत.
- युवराज सूर्यवंशी,
शहराध्यक्ष राष्ट्रवादी, म्हसवड
(चौकट)
प्रवाशांकडून आंदोलनाचा इशारा..
लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन तातडीने या रस्त्याच्या कामास सुरुवात करावी, अन्यथा म्हसवड बसस्थानक चौकात धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वरकुटे व परिसरातील गावांमधील प्रवाशांकडून देण्यात येत आहे.
०३पळशी
फोटो
माण तालुक्यातील मार्डी म्हसवड रस्त्याची दुरवस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत.