सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून येथील पोवई नाक्यावर फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पंचायत समितीसमोर प्रशस्त जागा देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोवई नाक्याने मोकळा श्वास घेतला आहे.पोवई नाका ते वायसी कॉलेज रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून फळविक्रेते बसलेले असायचे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही मोठा जटील बनत चालला होता. या रस्त्यावर रहदारी असल्यामुळे फळविक्रेत्यांचा चांगला व्यवसाय होत होता. त्यामुळे फळविक्रेते सहजासहजी त्या ठिकाणाहून हलत नव्हते. मात्र, पालिकेने फळविक्रेत्यांना त्या ठिकाणाहून हातगाडे हलवावेत, अशा वारंवार सूचना दिल्या होत्या. परंतु फळविक्रेते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अगोदर पर्यायी जागा उपलब्ध करून द्या; तरच या ठिकाणाहून आम्ही जातो, अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली होती. शेवटी पालिका प्रशासनाने पंचायत समितीसमोर प्रशस्त असा फूटपाथ तयार करून त्या ठिकाणी फळविक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सूचना केल्यानंतर मंगळवारी फळविक्रेत्यांनी पूर्वीच्या ठिकाणाहून हातगाडे हटविले. सध्या पंचायत समितीसमोर फूटपाथवर एका रांगेत हातगाडे लावले आहेत. त्यामुळे या नव्या मार्केटला आता चांगलीच झळाळी आली आहे. पूर्वी पंचायत समितीसमोरील रस्त्याचा केवळ वडाप गाड्या उभ्या करण्यासाठी वापर केला जात होता. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांची रहदारीही कमी होती. परंतु, आता फळविक्रेत्यांचे नवे मार्केट या ठिकाणी सुरू झाल्यामुळे वर्दळ वाढणार आहे. सध्या या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय या ठिकाणी होतोय की नाही, अशी शंका विक्रेत्यांना वाटतेय; परंतु हळूहळू नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर पूर्वीसारखा व्यवसाय होईल, असे एका फळविक्रेत्याने सांगितले. (प्रतिनिधी)ते सावलीखाली ...आम्ही वाऱ्यावर !फळविक्रेत्यांना नवे फूटपाथ मिळाले आहे. या ठिकाणी झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्वत्र सावली पडलेली असते. त्यामुळे काही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे की, आम्हालाही अशीच जागा हवी होती. फळविक्रेते सावलीखाली आम्ही वाऱ्यावर, असा दुजाभाव पालिकेने करू नये. फळविक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत ! पंचायत समितीसमोर फळविक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. या नव्या ठिकाणी येऊन विक्रेत्यांना दोन दिवस झाले. मात्र, फळविक्रेते अद्यापही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी मोकळे हातगाडे लावलेले दिसले, तर काहीनी फळविक्री सुरू केलीय; परंतु ग्राहक नसल्यामुळे विक्रेते चिंतेत आहेत.
फळ विक्रेत्यांना मिळाली प्रशस्त जागा
By admin | Updated: January 21, 2015 23:51 IST