कोपर्डे हवेली : ‘सामाजिक बांधीलकी जपत लोकांची सेवा करणारी अनेक लोक आहेत. सेवा करत असताना इतर सेवेपेक्षा समाजाची सेवा करताना आत्मिक समाधान मिळते,’ असे प्रतिपादन पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी केले.
सावळज, (ता. तासगाव) येथे कोरोना योद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी तासगावचे युवा नेते रोहिदास पाटील, जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील, सतीश पवार, संजय पाटील, कऱ्हाडचे उद्योजक पोपट साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ताजुद्दीन तांबोळी, तासगावचे माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, कोपर्डे हवेलीचे कोरोना योद्धा किशोर साळवे, कृषी फार्मर्स संस्थेचे संचालक मारुती चव्हाण, पैलवान अक्षय चव्हाण आदींची उपस्थिती होती.
आमदार लंके म्हणाले, ‘कोरोना रुग्णांचा आत्मविश्वास वाढवणे महत्त्वाचा असतो. त्यासाठी आपण त्यांच्यात मिसळले पाहिजेत. किशोर साळवेसारखे कोरोना योद्ध्याचे काम रुग्णात मिसळून गेल्या वर्षापासून करत असून, दिवसातील काही तासांतच घरी असतो. राहिलेले सर्व तास तो रुग्णात मिसळून काम करतो. घरची परिस्थिती बेताची असली तरी त्याच्या समाजसेवेची श्रीमंती मोठी आहे.’
रोहित पाटील म्हणाले, ‘कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. त्यांचा गौरव होणे अपेक्षित आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांना ऊर्जा मिळत असते.’ यावेळी आमदार लंके यांच्या हस्ते कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथील कोरोना योद्धा किशोर साळवे समवेत अनेकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर पाटील यांनी केले.