लोकमत न्यूज नेटवर्क
साताराः शहरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विना मास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून सोमवारी दिवसभरात दोनशेहून अधिक जणांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच शहरामध्ये बॅरिकेट्स आडवे लावून रस्ते अडविण्यात आले आहेत. प्रत्येकाकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.
सातारा शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस तर हा आकडा शंभरी पार झाला आहे. अनेकजण घराबाहेर पडताना अद्यापही काळजी घेत नाहीत. विनामास्क गाडीवर बसून अनेक जण येरझाऱ्या मारताना पोलिसांना आढळून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वाहनांची कागदपत्र तपासणी ऐवजी तोंडाला मास्क आहे का, हे तपासण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध चौकांमध्ये पोलिसांनी तपासणी केंद्र उभारले आहेत. सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत पोलिसांनी विना मास्कवर कारवाई केली. त्यानंतर दुपारच्या टप्प्यात रस्त्यावर शुकशुकाट होता. त्यामुळे पोलिसांना फारशी कारवाई करता आली नाही. परंतु सायंकाळी पाचनंतर नागरिक घराबाहेर पडले. यावेळी पोलिसांना अनेकजण तोंडाला मास्क न लावता आढळून आले. अशा लोकांना पोलिसांनी तत्काळ जागेवर दोनशे रुपयांचा दंड केला तर काहीजण काही काम नसताना बाहेर फिरण्यासाठी आले होते. पोलिसांना थातूर-मातूर उत्तर दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तर काही जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू ठेवली होती. दोन दिवसांपूर्वी रस्त्यावर वर्दळ दिसून येत होती. मात्र, सोमवारपासून पोलिसांनी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.
साताऱ्यातील राजवाडा, बसस्थानक, मोती चौक, कमानी हौद, पोवई नाका, विसावा नाका आणि समर्थ मंदिर या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केंद्र उभारले आहेत. विना मास्क फिरणाऱ्या कोणाचीही पोलिसांकडून गय केली जात नाही. जागच्याजागी दोनशे रुपयांची पावती फाडली जात आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल पाचशे रुपयांची पावती फाडली जात होती; परंतु सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा दंडाचा आकडा कमी करण्यात आला आहे.