सातारा : भरधाव वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकांवर भुईंज महामार्ग पोलिसांकडून सातत्याने कारवाया होत असून, वर्षेभरात वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल २९ हजार १७२ वाहनांवर कारवाई करून त्यांचा वेग रोखला आहे.
बेदरकारपणे भरधाव वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘स्पीड गन’द्वारे महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग मोजला जातो. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भुईंज महामार्ग पोलिसांनी डिसेंबरअखेर २९ हजार १७२ वाहन चालकांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात ३ हजार ४३८ वाहन चालकांनी आतापर्यंत दंड भरला आहे. तसेच उर्वरित वाहन चालकांकडे वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची रक्कम थकलेली आहे. संबंधित वाहन चालकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.
चौकट : धावत्या वाहनांचा मोजला जातो वेग
जिल्हा पोलीस दलाला २०१९ ला दोन इन्टरसेप्टर व्हॅन मिळालेल्या आहेत. यातील एक कऱ्हाड आणि दुसरी भुईंज महामार्ग पोलिसांना देण्यात आली आहे. या व्हॅनद्वारे मद्यपी वाहन चालक, चारचाकींना काळ्या फिल्मचा पारदर्शकपणा, वाहनांचा वेग मोजला जातो. वेगमार्यादेचे उल्लंघन संबंधित वाहन चालकांकडून केले जात असेल तर ते या व्हॅनमध्ये असलेली आधुनिक यंत्रणा स्मार्ट कॅमेऱ्याद्वारे अचूकरीत्या हेरते. या व्हॅनमधील स्मार्ट कॅमेरे सुमारे १ कि.मी. अंतरापर्यंत वाहने सहज आपल्या कॅमेऱ्यात टिपतात.
चौकट : वर्षेभरात केलेली कारवाई
जानेवारी २२४४
फेब्रुवारी २६८८
मार्च ३०८१
एप्रिल २०४
मे २५३५
जून ३२७४
जुलै २३१९
आॅगस्ट २०६२
सप्टेंबर १५०८
आॅक्टोबर २५७९
नोव्हेंबर ३४४१
डिसेंबर ३२२१
कोट :
भुईंज टॅप मार्फत वर्षभरात सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. आमची टीम रांत्रदिवस कार्यरत असते. भरधाव वाहन चालविणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी ‘इन्टरसेप्टर व्हॅन’चा वापर केला जात आहे. ही यंत्रणा अत्याधुनिक असून, वाहनांचा वेग अचूक मोजते. वाहन मालकाला दंडाची पावती मोबाईलवर पाठविली जाते.
दत्तात्रय गुरव-सहायक पोलीस निरीक्षक
.................................................................................