उत्तर-दक्षिण विस्तारलेल्या कोरेगाव तालुक्यात पावसाची परिस्थिती भिन्न असल्याने पीक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यानुसार तालुक्याच्या उत्तर भागात घेवडा जास्त प्रमाणात उत्पादित होतो. चालू खरीप हंगामात तालुक्यातील आकडेवारी पाहिली तर घेवड्यास सर्वसाधारण ११ हजार ६१४ हे क्षेत्र उपलब्ध असताना यातील जवळपास १० हजार ७०१ हे. वर घेवडा पेरणी झाली. म्हणजेच ९१३ हे क्षेत्र घटले आहे; तर सोयाबीनसाठी ८ हजार ४४६ हे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्र आहे. यात चालू हंगामात ११४७ हे.ने वाढ झाली. त्यामुळे सध्या घेवडा पिकास सोयाबीन पीक पर्याय ठरत आहे. सध्या तरी घेवडा पिकावरच येथील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान अवलंबून आहे. त्यामुळे या पिकाला शासन स्तरावर जास्तीत जास्त मदत मिळणे अपेक्षित आहे. वाघा घेवडा हे पीक संपूर्णपणे हवामानावर अवलंबून असलेलं पीक यंदा शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देणारे पीक ठरत आहे. सध्या घेवड्यास ७५ ते ८० रु प्रतिकिलो असा दर मिळत आहे, तर सोयाबीनला ही प्रति ९० ते १०० रु. किलो दर मिळत आहे. याशिवाय तालुक्यात आलं, ऊस ही हुकमी पैसे मिळवून देणारी पिके उत्पादित होत असली, तरी या दोन्ही पिकांबाबत दराची हमी नसल्याने या पिकांबाबत शेतकरी उत्साही दिसत नाही. दिल्लीकरांच्या जिभेचे चोचले पुरवणारा वाघा घेवडा अलीकडच्या काळात जगाच्या नकाशात गेला, मात्र सध्या तरी केवळ ‘नाव मोठं, लक्षण खोटं’ अशीच काहीशी या पिकाची अवस्था आहे.
कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील जय तुळजाभवानी शेतकरी बचत गट वाघ्या घेवड्यास जागतिक मानांकन मिळवून देण्यास यशस्वी ठरला; मात्र यासाठी आमच्याकडे भांडवल नसल्याने आम्हाला राजमा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देता येत नाही
मधुकर कदम, अध्यक्ष, जय तुळजा भवानी शेतकरी बचत गट
पोस्टाच्या तिकिटावर कोरेगावचा घेवडा आल्यामुळे मार्केटिंगमध्ये प्रभाव पडेल, तसेच "विकेल ते पिकेल" या योजनेअंतर्गत पीक समूहात सोयाबीन व घेवडा पिकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांना चागले दिवस येतील, असे कोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांचे मत आहे.