वाई : उत्तरेतील काशीमध्ये राजकीय लाट असली, तरी ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असणार्या वाई शहर आणि परिसरात मात्र चित्रीकरणाची लाट आली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक निर्माते या ठिकाणी आकर्षित होत असून, दिवसेंदिवस अनेक भाषांमधील चित्रपटांची चित्रीकरणे येथे होऊ लागली आहेत. वाढत्या चित्रीकरणांमुळे अनेक स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. महाबळेश्वरात उगम पावणार्या व वाईजवळ संथ वाहणार्या कृष्णा नदीच तीरावर असणारी हिरवीगार झाडी व निसगसौंदर्य चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अत्यंत पूरक आहे. वाईचा महागणपतीचा प्रसिद्ध आणि पुरातन घाट, अनेक देवदेवतांची मंदिरे, शेजारीच असणार्या मेणवली गावातील नाना फडणवीसांचा वाडा, रेखीव घाट, धोम धरण परिसर, पसरणी, कुसगाव, मुगाव, वरखडवाडी येथील जुने वाडे, टुमदार गावे व पश्चिम भागातील निसर्गरम्य परिसर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अत्यंत सुंदर असल्यानेच दिवसेंदिवस मराठी, हिंदी, भोजपुरी तसेच दाक्षिणात्य भाषांमधील चित्रपट निर्मातेही वाईकडे वळू लागले आहेत. अनेक मालिकांची चित्रीकरणही या परिसरात होत असून, दिग्गज निर्मात्यांचे दर्शन वाईकरांना कायम घडत आहे. काही वर्षांपासून येथील नवोदित तरुणांनी चित्रपट व्यवसायाच्या अनुषंगाने अनेक उद्योग सुरू केले आहेत. यातून बेरोजगार तरुणांना, नागरिकांना काम मिळत आहे. चित्रपटाच्या ‘युनिट’ला जेवण पुरविण्यासाठी ‘केटरिंग’ व्यवसाय बहरतो आहे. चित्रीकरणाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी वाहने भाड्याने देण्याचा व्यवसायही जोमात आहे. त्याचप्रमाणे चित्रपटातील दृष्यांसाठी ‘ज्युनिअर आर्टिस्ट’ची गरज नेहमीच असते. मुंबईच्या तुलनेत येथे ‘ज्युनिअर आर्टिस्ट’ कमी पैशांत मिळत असले, तरी स्थानिकांच्या दृष्टीने ही कमाई फार मोठी ठरते. ‘ज्युनिअर आर्टिस्ट’ पुरविण्याचा व्यवसायही वाई परिसरात चांगलाच बहरला आहे. अलीकडे वाई शहरात पुण्या-मुंबईच्या धर्तीवर सर्व सोयींनी युक्त नवी हॉटेल उभी राहिली आहेत. राहण्याची उत्तम सोय सध्या वाई शहरात उपलब्ध आहे. चित्रीकरणाच्या काळात ‘युनिट’मधील महत्त्वाच्या व्यक्ती या हॉटेलमध्ये डेरा टाकतात. एरवी चांगल्या सोयीसुविधांमुळे पर्यटकही या भागात मोठ्या संख्येने येऊ लागले असून, हॉटेल व्यवसायही तेजीत आहे. चित्रपटासाठी स्थळांची पाहणी (लोकेशन हंटिंग) करायला अनेक निर्माते सातत्याने वाई परिसरात येत आहेत. त्यामुळे वाई हे चित्रपटसृष्टीसाठी प्रमुख व महत्त्वाचे केंद्र बनत आहे. अनेक कारणांमुळे रोजगार मिळत असल्याने स्थानिक तरुण समाधानी आहे.
‘दक्षिण काशी’मध्ये फिल्लमवाल्यांची लाट!
By admin | Updated: May 23, 2014 22:56 IST