वाठार स्टेशन : निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण या निवडणूक आयोगाच्या आदेशाचे सुरुवातीला अनेकांनी स्वागत केलं, मात्र आता निवडणूक झाल्यानंतर जाहीर झालेल्या सरपंचपदाच्या आरक्षणात अनेक गावांमध्ये सरपंचपदाचा उमेदवार नसल्याने या गावांना सध्या तरी किमान महिनाभर सरपंचपदाविनाच राहावं लागणार आहे.
राज्यभर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या सरपंच आरक्षण प्रक्रिया नुकतीच पार पडली. मात्र, कोरेगाव तालुक्यातील सोळशी, तडवळे (स) वाघोली, तळिये, काळोशी या गावात सरपंचपद असलेला उमेदवार नसल्याने या गावाला गावकारभारी निवडण्यासाठी किमान अजून महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. या गावासह अजूनही अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याने निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षण बरं होतं, असं म्हणण्याची वेळ आली आहे.
सरपंच आरक्षण ज्या कालावधीत जाहीर करण्यात आली आहे. त्याचवेळी या गावातील सरपंच निवड कार्यक्रम होणार असून, यावेळी संबंधित आरक्षण असलेला उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही तर हे पद रिक्त समजण्यात येऊन पुढील आदेश जिल्हाधिकारी देतील त्याप्रमाणे पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती कोरेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम यांनी दिली.
कोट..
सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत आरक्षण प्रक्रिया नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक गावांमध्ये सरपंच पदाचा उमेदवार नसला तरीही याबाबतीत कोणीही काळजी करू नये, लवकरच अशा ग्रामपंचायत आरक्षणाबाबत नियमांप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी
.....................................
कोट..
नेहमीप्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणुकीपूर्वी जाहीर व्हावं, त्यामुळे किमान त्या आरक्षण असलेला उमेदवार निवडून आणणे सोयीचं होईल.
-अमोल आवळे, कोरेगाव-फलटण शिवसेना क्षेत्रप्रमुख