यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहात तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी स्वत: ही आरक्षण सोडत जाहीर केली. यावेळी शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
सकाळी ११.३० वाजता सोडतीला प्रारंभ झाला. अनुसूचित जाती महिलांच्यासाठी तेरा गावांच्या चिठ्ठ्या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढून आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. त्यानंतर बारा ठिकाणी याच प्रवर्गातील पुरुषांसाठी सोडत काढण्यात आली, तर अनुसूचित जमातीसाठी एका गावात आरक्षण देण्यात आले. त्यापाठोपाठ इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करायला सुरुवात झाली. सन १९९५ पासून ज्या गावांना एकदाही या प्रवर्गाचे आरक्षण पडलेले नाही. त्या गावांना आरक्षण देण्यात आले. त्यानंतर सन २००० सालचे आरक्षण विचारात घेऊन पुढील आरक्षण जाहीर करण्यात आले, तर या प्रवगार्साठी पाच गावांचे आरक्षण चिठ्ठ्या टाकून निश्चित करण्यात आले. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षणे स्त्री किंवा पुरुष निश्चित केले. तालुक्यातील १२० गावांत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडले. त्यातील साठ गावे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली, तर ५४ गावांना नागरिकांचाच मागास प्रवर्गासाठी लॉटरी लागली. त्यात २७ गावांत महिला कारभार पाहणार आहेत.
नुकत्याच निवडणूका झालेल्या गावातील सदस्य ‘मीच सरपंच होणार’ अशी अटकळ बांधून आले होते, पण आरक्षण जाहीर होताच ‘कही खुशी, कही गम’ परिस्थिती दिसली. मतदान झाल्यानंतर महिन्याच्या आत सरपंच-उपसरपंच निवडप्रक्रिया पूर्ण करायची असते. त्यामुळे येत्या १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. तोवर अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत हे मात्र नक्की !
- चौकट
अनेकांची धाकधूक वाढली
तालुक्यातील अनेक गावांत काही पॅनलने काठावरचे बहुमत मिळवले आहे. त्या गावात आपले नवनिर्वाचित सदस्य आपल्या पॅनलसोबत कायम ठेवणे नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.