वाई : वाई शहराच्या पश्चिम भागात असणाऱ्या पसरणी घाटात वृक्षांची कत्तल राजरोसपणे होत आहे. त्यामुळे वृक्षपे्रमीतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाईच्या पश्चिम भागासह परिसरातील डोंगरावरील झाडे व जंगले ही संरक्षित आहेत़ यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचा व पक्षांचा अधिवास आहे़ अशा ठिकाणची वृक्षतोड झाल्यास या प्राणी व पक्षांचा संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो़ वाई पासून अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर रेशीम केंद्राजवळ पसरणी घाटात मुख्य रस्त्याच्या बाजूलाच अनेक झाडांची कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ संबंधित विभागाने याकडे डोळेझाक केल्याने वृक्षप्रेमी व स्थानिक नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे़ वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी आहे. ही झाडांची हिरवाई पर्यटकांसह स्थनिकांना भूरळ पाडत असते़ या परिसरात अनेक प्राणी आहेत. यामध्ये काळवीट, ससे, कोल्हे, रानडुक्कर, मुंगुस, सायाळ तसेच मोर, गरुड, घार, कोकीळ असे विविध प्रकारचे पक्षी आहेत. अनेक सरपटणारे जीव वास्तव्यास आहेत़ त्यामुळे झांडाची कत्तल होत राहिल्यास जंगली जिवांचा अधिवास धोक्यात येणार आहे़ कत्तल करणाऱ्या लोकांनी झाडे ही अर्ध्यातून तोडून नेली आहेत़ तरी संबंधित विभागाने पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करावी य पसरणी घाटात वनविभागाच्या पथकाची नेमणूक करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमीमधून जोर धरू लागली आहे़ (प्रतिनिधी)या परिसरात असे प्रकार यापूर्वीही वारंवार घडले असून, आम्ही काही लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे़ संबंधित ठिकाणची पाहणी करून राजरोसपणे झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे.- पी़ डी़ बुधनवर, वनक्षेत्रपाल वाई
पसरणी घाटात वृक्षांची सर्रास कत्तल !
By admin | Updated: March 8, 2016 00:46 IST