ढेबेवाडी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची आता कोरोना चाचणी घेण्यात येते. त्यानुसार कुंभारगाव येथे रविवारी अँटिजन तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यातील सहाजणांचा अहवाल बाधित आल्यामुळे गावच्या चिंतेत भर पडली आहे.
या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी व केतकी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेविका ए. एम. कांबळे, आरोग्यसेवक रोहित भोकरे, डॉ. सुप्रिया यादव, आशासेविका सुनीता सुतार, पोलीसपाटील अमित शिंदे यांनी भाग घेतला. यावेळी येथील ग्रामस्थांना मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी डॉ. सुप्रिया यादव म्हणाल्या, ‘ज्या गावात तपासणी शिबिर घेण्यात येईल, त्याठिकाणी लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने न घाबरता कोरोना चाचणी करून घ्यावी व उपचार घ्यावेत. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ.’
कुंभारगावमध्ये सोमवार, दि. २१ जूनपासून संपूर्ण गावात सरसकट सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीसपाटील अमित शिंदे व सरपंच सारिका पाटणकर यांनी केले आहे.