सांगली/मालगाव : जिल्ह्यात आठवड्याभरात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले असून, यामधील पाच जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात दक्षता घेण्याचे आदेश आले असून, सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात अमणापूर (ता. पलूस) येथे ३, तर वाटेगाव (ता. वाळवा) येथे दोन डेंग्यूचे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर मालगाव (ता. मिरज) येथे एक रुग्ण आढळला असून, त्याच्यावर आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात डेंग्यूची साथ नाही, मात्र सतर्कता बाळगण्याचे आदेश आले आहेत. यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पुरेसा औषधसाठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गतवर्षी डेंग्यूचे २१ रुग्ण आढळले होते. यावर्षी डेंग्यूवर नियंत्रण ठेवण्यात बऱ्यापैकी यश आले आहे, अशी माहिती डॉ. हंकारे यांनी दिली. दरम्यान, मालगाव (ता. मिरज) येथे डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने, या साथीचा फैलाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य यंत्रणेच्या पथकाने गावात जोरदार आरोग्य तपासणी मोहीम व डास निर्मूलनची उपाययोजना राबविली आहे. तसेच ग्रामपंचायतीने बावाफन उरूसानिमित्त यापूर्वीच स्वच्छता व पाणी शुध्दीकरण मोहीम हाती घेतली आहे.मालगाव येथील सानिका पिंटू कांबळे (वय १३) या मुलीला ताप येणे, पेशी कमी होणे व अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांच्या तपासणीत या मुलीला डेंग्यूसदृश साथीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मालगावमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने, डेंग्यू साथीचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी मोहीम, तसेच पावसाच्या साचलेल्या पाण्यातील डास निर्मूलनाची उपाययोजना हाती घेतली आहे. मालगाव येथील आरोग्य पथक, एरंडोली व खंडेराजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १७ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने दिवसभरात अकराशे जणांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीत तापाचे रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर पावसाच्या साचलेल्या पाण्यात उत्पत्ती होणाऱ्या डासांच्या निर्मूलनासाठी गप्पी मासे सोडणे, तसेच जळक्या तेलाचा वापर केला जात आहे. (वार्ताहर)सभापतींची मालगावला भेट!मालगाव येथे डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने मिरज पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे, विरोधी पक्षनेते अरुण राजमाने, सदस्य सतीश निळकंठ, विश्वास खांडेकर यांनी गावास भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रात जाऊन मोहिमेची माहिती घेऊन, साथीचा फैलाव होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सानिका कांबळे या मुलीच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मालगावमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने जिल्हा हिवताप अधिकारी संगीता देशमुख, साथ रोग निर्मूलन पथकाचे प्रमुख संतोष पाटील, आरोग्य सहाय्यक सुरेश कांबळे, आरोग्य सेवक मुसा पेंढारी यांनी गावास भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे सहा रूग्ण आढळल
By admin | Updated: November 6, 2014 00:37 IST