सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणच नव्हे तर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागल्याने नागरिक सुन्न झाले आहेत. उपचारासाठी रुग्णांना बेड मिळेना, लाख प्रयत्न करून कुठे बेड मिळालाच तर रेमडेसिविर इंजेक्शन मिळेना, अशी स्थिती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. सातारा पालिकेच्या वॉर रूममध्ये दररोज तीन ते चार नागरिकांचे फोन येत असून, ‘साहेब... रुग्णाला एक बेड मिळेल का, रेमडेसिविर इंजेक्शन कुठे उपलब्ध होईल का,’ अशी विचारणा केली जात आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत असताना वर्षभरापासून पालिकेची यंत्रणाही कोरोनाची लाट थोपवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. पालिकेचे सुमारे १२५ कर्मचारी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी झटत असून, प्रत्येकावर कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागरिकांसाठीही पालिकेच्या कोरोना विभागात वॉर रूम तयार करण्यात आला आहे. या वॉर रूममधून नागरिकांच्या अडचणी वेळेवर सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
दररोज तीन ते चार नागरिक या वॉर रूमशी संपर्क करून कुठे बेड उपलब्ध आहे का, ऑक्सिजनची गरज, रेमडेसिविर इंजेक्शन, प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी, आदींची मागणी करत आहेत. काही नागरिकांच्या मागण्या व तक्रारींची तातडीने सोडवणूकही केली जात आहे. या वॉर रूममध्ये तीन कर्मचारी कार्यरत आहेत.
(चौकट)
कोणाला बेड हवा तर कोणाला रेमडेसिविर इंजेक्शन
सातारा पालिकेच्या कोरोना वॉर रूमशी दररोज तीन ते चार नागरिक मदतीच्या अपेक्षेने संपर्क साधत आहेत. सध्या बाधितांची संख्या वाढू लागल्याने रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. अशा रुग्णांना बेड उपलब्ध व्हावा, यासाठी कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून वॉर रुमकडे कुठे बेड उपलब्ध आहे का, याची विचारणा केली जात आहे. अनेकजण रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीही करत आहेत. वॉर रूममधील कर्मचाऱ्यांकडून शक्य तितकी मदत नागरिकांना केली जात आहे.
(चौकट)
वॉर रूमध्ये तीन कर्मचारी कार्यरत
१. पालिकेच्या कोरोना वॉर रुमध्ये कोरोना विभागप्रमुखांसह तीन कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याची माहिती संकलित करणे. संबंधित घर अथवा अपार्टमेंट सील करणे, नागरिकांची आरोग्य तपासणी करणे अशी कामे या वॉर रूमच्या माध्यमातून केली जातात.
२. याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे, शहरातील दुकानदार, व्यापारी, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे, गृह अलगीकरणातील रुग्णांच्या आरोग्य नोंदी ठेवणे, अशी कामे या वॉर रूमच्या माध्यमातून केली जात आहेत.
(चौकट)
अडचणी अनेक :
सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही नागरिक सरकारी तर काही खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी करतात. यावेळी नागरिकांकडून अर्धवट पत्ता दिला जातो, मोबाईल क्रमांकही चुकीचा असतो, अशावेळी बाधित रुग्णांशी संपर्क साधताना कर्मचाऱ्यांची दमछाक होते. अशा रुग्णांचा शोध घेऊन उपाययोजना करणे जिकरीचे बनत आहे.
(कोट)
पालिकेच्या कोरोना कक्षात प्राप्त होणाऱ्या तक्रारी व अडचणींची तातडीने सोडवणूक केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्र करणे, औषध फवारणी, लसीकरण, कोरोना चाचणी अशी कामे प्राधान्याने केली जात आहेत.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी
फोटो : १९ पालिका वॉर रूम
सातारा नगरपालिकेच्या वॉर रूममधून कोरोना प्रतिबंधाचे काम केले जात आहे.
(डमी न्यूज)