सातारा : सातारा शहरालगत असणाऱ्या सैदापूर येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती सभापती धर्मराज घोरपडे यांना धारेवर धरले. पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे तसेच ग्रामसभेत सरपंच अशोक भोसले आणि विस्तार अधिकारी धनवडे कोणालाही विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला.दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनाही घेराव घातला आणि त्यांच्यावरही आगपाखड केली. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेतली आणि त्यांना आपली समस्या सांगितली. सैदापूर येथील दोनशेहून अधिक ग्रामस्थ दुपारी सातारा पंचायत समितीत आले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. येथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापती घोरपडे यांच्या दालनात धाव घेतली. घोरपडे त्यांच्या दालनातच बसले होते. एवढ्या मोठ्या संख्येने आलेले ग्रामस्थ पाहून त्यांच्याही लक्षात काही आले नाही. प्रवीण पवार, वैभव पवार, विलास पवार, विनायक पवार, सतीश पवार, एकनाथ पवार, विशाल जाधव त्याचबरोबर उपस्थित ग्रामस्थ आणि महिलांनी सर्व घटनेची माहिती घोरपडे यांना दिली. सैदापूर येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे अध्यक्ष धोंडिराम जाधव आणि सचिव नंदू पवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.यानंतर घोरपडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या ग्रामस्थांसमोरच चर्चा केली. (प्रतिनिधी)
सैदापूर ग्रामस्थांचा सभापतींना घेराव
By admin | Updated: July 25, 2014 22:12 IST