लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : येथील करंजे परिसरात दीड वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक लाइन ओढण्याचे काम सुरू असताना खांबावरून खाली पडून जखमी झालेल्या गोरख तरडे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अमोल कारंडे (रा. आरफळ, ता. सातारा), विजय फडतरे, साठे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सातारा शहरातील आयडीबीआय बँकेच्या करंजे शाखेजवळील खांबावर इलेक्ट्रिक लाईन ओढण्याचे काम सुरू होते. मात्र, अमोल कारंडे, विजय फडतरे आणि साठे या तिघांकडून वीजप्रवाह बंद असल्याची आवश्यक ती खात्री न करता हलगर्जीपणा केल्यामुळे गोरख बापूराव तरडे (वय २१, रा. मलवडी, ता. फलटण) हा युवक शॉक लागून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तो जखमी झाला. यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गोरख तरडे याचा मृत्यू हा आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे तसेच लाइनमनकडून आवश्यक त्या उपाययोजना न केल्यामुळे झाला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक वैशाली लोखंडे यांनी या तिघांवर तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे करत आहेत.