सातारा : ‘मागील विधानसभा निवडणुकीत सातारा-जावळी मतदारसंघातून विद्यमान आमदारांना निवडून आणले. पण, त्यांनी निवडणुकीनंतर आघाडीधर्माला कोलदांडा लावला. त्यामुळे या निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. प्रसंगी अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवेन; पण शिवेंद्रसिंहराजे यांना कोणत्याही परिस्थितीत कसलीही मदत करणार नाही,’ अशी घोषणा माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी केली.येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. यावेळी चंद्रसेन शिंदे, मोहन कासुर्डे, प्रकाश परामणे, सचिन करंजेकर, शिवाजी गोरे, संदीप गायकवाड तसेच इतर कार्यकर्ते, आदी उपस्थित होते.पत्रकार परिषदेत माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर तोंडसुख घेतले. ‘बोलल्याप्रमाणे त्यांनी कोणतीही मदत केली नाही, असा आरोपही केला.’सपकाळ पुढे म्हणाले, ‘सातारा-जावळी मतदारसंघातील जनतेची चाललेली पिळवणूक, चेष्टा, फसवणूक, भूलथापा यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या माध्यमातून आघाडीधर्म पाळायचा म्हणून विद्यमान आमदारांना निवडून आणण्यासाठी मनापासून व प्रामाणिक प्रयत्न केले. पण, त्यांनी या प्रामाणिकपणाची सामाजिक व राजकीय किंमत गेल्या पाच वर्षांत भोगायला लावली.माझ्या ग्लुकोजच्या कारखान्याला भागभांडवालाची ते मदत करणार होते. ती अद्याप मिळालेली नाही. जावळी तालुक्यातील हजारो बेरोजगारांना त्यांनी रोजगारापासून वंचित ठेवले आहे. याउलट त्यांनी ग्लुकोज कारखाना होऊ नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून विरोधात जोरदार प्रयत्नही केले.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला अग्रक्रमाने जागा देऊन आघाडीमार्फत निवडणूक लढविण्याचा निर्णय ठरला होता; परंतु शेवटी तो शब्दही त्यांनी पाळला नाही. त्यामुळे आता वेगळा निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)‘शेतकऱ्यांना भिकारी बनविण्याचा प्रयत्न’‘फळे-फुले नावाची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत दिल्ली, हैद्राबाद, बंगळूर, पुणे येथे माल पाठवला जातो. तिकडे दर १५ रुपये मिळतो तर इथे शेतकऱ्यांना पाच रुपये दिले जातात. ही तफावत शेतकऱ्यांना सधन नाही तर भिकारी बनविण्यासाठी आहे. यासंबंधीचे पुरावे माझ्याकडे आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ‘कोण फुललं व कोण कोमेजलं’ हे जनतेसमोर उघड करणार आहे. याची साखळी दिल्लीच्या बागवानी बोर्डापासून सातारपर्यंत कशी कार्यरत आहे, हेही पुराव्यानिशी योग्यावेळी सांगणार आहे. विविध कामे ठराविक ठेकेदारांनाच देण्यात येत आहेत,’ असा आरोपही सपकाळ यांनी यावेळी केला.अजित पवारांवरही आरोपग्लुकोज कारखान्याला कोणाकोणाचा विरोध आहे, अशी विचारणा पत्रकारांनी सपकाळ यांना केली. यावर त्यांनी अजित पवार यांचा विरोध होता, असा आरोप करतानाच त्यांना कोण काय सांगत होते काय माहीत,’ अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
आघाडीधर्माला शिवेंद्रराजेंचा कोलदांडा
By admin | Updated: August 11, 2014 00:13 IST