मिरज : मिरजेत ब्राह्मणपुरी परिसरात शुक्रवारी रात्री संभाजी ब्रिगेड व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. हाणामारीत संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता जखमी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी जमावाला पिटाळून लावले. मात्र, या घटनेबाबत पोलिसांत नोंद नसल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी रात्री शिवराज पवार या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील ब्राह्मणपुरीत भोकरे गल्ली येथे अभिजित कदम याच्या घरात संभाजी ब्रिगेडचे संतोष पाटील, शिवराज पवार, प्रवीण भोसले, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते जमले होते. त्याच परिसरात शिवप्रतिष्ठानचेही कार्यकर्ते होते. कार्यक्रम संपवून परत जाताना परस्परांना उद्देशून शेरेबाजी केल्याच्या कारणावरून शिवप्रतिष्ठान व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकमेकाला भिडले. दोन्ही बाजंूच्या कार्यकर्त्यांत हाणामारी सुरू झाल्याने पळापळ झाली. भिंतीवर डोके आपटल्याने संतोष पाटील हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता जखमी झाला. हाणामारीच्या घटनेमुळे तणाव निर्माण होऊन शिवप्रतिष्ठानचे विनायक माईणकर, किशोर झांबरे, प्रमोद धुळुबुळू, चंद्रकांत मैगुरे यासह शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा जमाव जमला. हाणामारीचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पिटाळून लावले. या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले. दोन गटांत मारामारीचा प्रकार घडला. मात्र, वाद मिटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसाई यांनी सांगितले. (वार्ताहर) परस्परविरोधी आरोप सांगलीत शिवजागर परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाला आक्षेप घेणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे मिरजेत जमले होते, असा आरोप करीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विशिष्ट समाजाच्या नादाला लागले असल्याची शेरेबाजी करीत मारामारीला सुरुवात केल्याचे शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत तक्रार करण्यात आलेली नाही.
शिवप्रतिष्ठान-संभाजी ब्रिगेडमध्ये हाणामारी
By admin | Updated: August 23, 2015 00:37 IST