शिंगणापूर : महाशिवरात्र सोमवारी आल्यामुळे शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आले होते. मध्यरात्री एकपासूनच भाविकांनी उपस्थिती लावण्यास सुरुवात केली होती. रात्री तीनपासून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दिवसभरात सुमारे दीड लाख भाविकांनी हर हर महादेवच्या गजरात दर्शन घेतले. दरम्यान, गुजरातमार्गे देशात दहा दहशतवादी घुसले असल्याची माहिती असल्याने येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहे. या ठिकाणी दर सोमवार, अमावस्या तसेच दररोजही हजारो भाविक येत असतात. विशेष करून महाशिवरात्रीला येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. यावर्षी महाशिवरात्र सोमवारी आल्यामुळे हजारो भाविक येणार हे स्पष्ट होते. मध्यरात्रीपासूनच शिंगणापूर येथे भाविक येऊ लागले होते. रात्री तीनच्या सुमारास मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासून तर मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनाची रांग दूरवर गेली होती. येथे येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने दक्षता घेण्यात आली होती. उमाबनात पार्किंगची सोय करण्यात आली होती. राज्य परिवहन मंडळाच्या सातारा विभागामार्फत २०, सांगली १० तर सोलापूर विभागाच्या वतीने २० गाड्यांची सोय करण्यात आलीहोती. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे, एस.बी. कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाशिवरात्रीनिमित्त कल्पनाराजे भोसले यांच्यासह माळशिरसच्या तहसीलदार माने व प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही श्री शंभू महादेवाचे दर्शन घेतले. दरम्यान, जिल्ह्यात विविध ठिकाणी महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. सातारा शहरातील मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. काही मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. (वार्ताहर) यवतेश्वरला दर्शनासाठी भाविकांची रांगपेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या यवतेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त श्रीशंभू महादेवाचे दर्शन हजारो भाविकांनी घेतले. दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. सोमवारी दिवसभर यवतेश्वर परिसरात भक्तिमय वातावरण होते. सकाळी तर असंख्य भाविक साताऱ्याहून यवतेश्वरकडे पायी प्रवास करत होते. त्यामुळे यवतेश्वर घाट भाविकांनी फुलून गेला होता. सोमवारी सकाळी आरती, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर हजारो भाविकांनी श्रीशंभू महादेवाचे दर्शन घेतले. तसेच फुले, हार, नारळ, बेलाचे पान, आंब्याचा मोहोर असलेले पूजेचे साहित्य, पेढे, मिठाईने संपूर्ण परिसर गजबजलेला होता. दिवसभरात सातारा शहरासह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.यवतेश्वर येथील शंभू महादेवाची यात्रा दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर होत असते. यावेळी येथील प्राचीन आम्र वृक्षाची पूजा झाल्यानंतर श्रीच्या मोहोर रूपी दर्शनार्थ हजारो भाविकांची उपस्थिती असते. आजही महाशिवरात्री निमित्त श्रीशंभू महादेवाच्या दर्शनासाठी पूजेच्या साहित्यात बेलाचे पान, आंब्याचा मोहोर वाहिला जातो. - प्रदीप पवार, पुजारी यवतेश्वर देवस्थान
शिखर शिंगणापूरला शिवभक्तांचा जनसागर
By admin | Updated: March 8, 2016 00:51 IST