सातारा : जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा शहराला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला अन् नागरिकांना मेढा शहराचा कायापालट होईल, सुविधा मिळतील असे वाटले, पण मेढेकरांचे हे स्वप्न गेली ५ वर्षे दिवास्वप्नच राहिले असून लाखो रुपयांचा निधी मिळूनदेखील जीवनावश्यक असलेले पाणी आजही नागरिकांना एक दिवसाआड व फक्त अर्धा तास मिळत आहे. त्यामुळे मेढा नगरपंचायतीचा कारभार म्हणजे विकास पडद्याआड, सुविधा दिवसआड अशी झाली आहे.
नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत मेढा नगरपंचायत पहात असून आता कचरा गोळा करणारी घंटा गाडी देखील एक दिवसाआड कचरा गोळा करून नेत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपंचायतीचा कारभार बघून मेढा नगरपंचायतीची नोंद ‘गिनीज बुकात’केली पाहिजे, अशी संतप्त अन उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे.
मेढा नगरपंचायतीबाबत शासनाची २७ मे २०१६ रोजी अधिसूचना झाली अन् मेढा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. मात्र, मुख्याधिकारी यांची नेमणूक न झाल्याने नगरपंचायतीचा कारभार १८ डिसेंबर २०१६ अखेर प्रशासक म्हणून तत्कालीन तहसीलदार यांच्याकडे राहिला. मेढा नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ ला झाली. मात्र, नगराध्यक्ष निवडणूक ही १० जून २०१७ रोजी झाली.अन हौसाबाई मुकणे या नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या.
संपूर्ण राज्यात खेडोपाडीदेखील नागरिकांना जीवनावश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा दररोज होतो. मात्र, राज्यात मेढा या एकमेव शहरात गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ एक दिवसाआड फक्त अर्धा तास, फिल्टर न केलेला पाणीपुरवठा होत आहे. मात्र, पाऊस चांगला होत असलेल्या भागात ही स्थिती आहे.
मेढा नगरपंचायतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नगरसेवक १७, कारभारी १२ अन् कामाचे तीन तेरा, अशी आहे. आजपर्यंत मेढा नगरपंचायतीत मुख्याधिकारी म्हणून ६ तहसीलदार यांनी प्रशासक म्हणून तर ६ जणांनी मुख्याधिकारी म्हणून कारभार पाहिला आहे. मेढा नगरपंचायतीत १७ नगरसेवकांचा कार्यकाल सुरू झाला अन मेढा शहराचे रुपडे बदलेल, अशी अपेक्षा नागरिकांच्यात निर्माण झाली. मात्र, या अपेक्षांचा भंगच झाला असून सुविधा तर सोडाच, नागरिकांना जीवनावश्यक असणारा पाणीपुरवठा देखील गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ एक दिवसाआड व फक्त अर्धा तास होत आहे. तसेच हे पाणीदेखील फिल्टर होऊन मिळत नाही. पाणीपुरवठा ६ महिने अन् पाणीपट्टी ही १ वर्षाची घेतली जाते. सुविधांच्या नावाने बोंब असणाऱ्या मेढा नगरपंचायतीने आता कचरा गोळा करणेदेखील एक दिवसाआड सुरू केले असून त्यामुळे ओला कचरा नागरिकांना घरातच ४८ तास ठेवावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील धोका निर्माण झाला आहे. मेढा शहरात झालेल्या विकासकामांचे देखील ऑडिट होणे गरजेचे आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, गटार कामाचा निकृष्ट दर्जा याबाबत देखील नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे. अनेक बेकायदेशीर बांधकामे ‘पांडुरंगाच्या कृपेने’ चालू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रकरणी लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे.
तीन माकडांसारखी अवस्था...
मेढा नगरपंचायतीची अवस्था गांधीजींच्या तीन माकडाप्रमाणे असून प्रशासनाचे कानावर हात, नगरसेवकांचे डोळ्यावर हात अन नागरिकांचे तोंडावर हात म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी झाली आहे.