मेढा : ‘कुरघोडीचे राजकारण मी करीत नाही. मी दिलेल्या शब्दाला जगणारा आहे. जावळीचा विषय आला की दरवेळी माझ्यावर आरोप केले जातात, पण मी ते खपवून घेणार नाही. कोरेगावच्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब महाराजांच्या विचारांचा प्रत्येक कार्यकर्ता हा शशिकांत शिंदे यांच्याबरोबरच होता; यामुळे न केलेल्या कामाचे खापर माझ्यावर फोडू नका,’ असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.
कुडाळ येथे बुधवारी (दि. ३) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे, माजी सभापती मोहन शिंदे, हणमंत पार्टे, रवींद्र परामणे, पंचायत समिती सदस्या अरुणा शिर्के, वीरेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे, शिवाजी नवसरे, कमलाकर भोसले, प्रशांत तरडे, संदीप परामणे उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘माझे काम सरळमार्गी आहे. राजकारणावर माझे घर चालत नाही. मी आमदार असलो किंवा नसलो, फरक पडत नाही. छत्रपतींचा वारसदार ही ओळख माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. जावळीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्यनशील असून चुकीचे राजकारण कधीच करीत नाही. माझे ज्यांना पटत नसेल त्यांनी त्यांच्या मार्गाने जावे. एकनिष्ठ राहतील त्यांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे. राजकारणात माझी ताकद आणि माझ्या शब्दाला किती किंमत आहे, याची मला माहिती आहे. मतदारसंघात करीत असलेल्या विकासकामांवरून ते दाखवूनही दिले आहे. केवळ कामापुरते माझ्याकडे यायचे व ऐनवेळी विरोधकांच्या सोबत फिरायचे हे चालणार नाही.’
चैाकट
राजकीय धोके ओळखून भाजपमध्ये
काही अडचणी आणि अंतर्गत विषयांमुळे पुढील राजकीय धोके ओळखून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यात माझी नेमकी काय चूक झाली? माझ्यासोबत असणाऱ्या कोणाचेही राजकीय भवितव्य धोक्यात घातले नाही. तसेच कोणावरही जबरदस्ती केली नाही. राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात. वातावरणाच्या बदलानुसार निर्णय होत असतात. माझ्याबरोबर कायम राहतील अशा सर्वांची मला गरज आहे. त्यांना बरोबर घेऊन पुढे जाणार आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.