रहिमतपूर : कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेतकरी संघटना किसान मंचचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक शंकरराव
गोडसे सहकाऱ्यांसह सहभागी झाले आहेत.
सरकारने कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांवर जे काळे कायदे लादलेले आहेत, ते रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी देशातील सर्व राज्यांतून दिल्लीला जाणाऱ्या चार सीमा (रस्ते) बंद करून या कायद्याचा किसान मंचच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. शेतकरी संघटना किसान मंच यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा संगीता मोडक, महाराष्ट्राचे निमंत्रक खेमराज कोर, हरियाणाचे हरपाल सिंग, संतोष सोळंकी, घनसिंग सारावत, लक्ष्मण वंगे या सर्व सहकाऱ्यांसोबत शंकरराव गोडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय किसान मंचचे आंदोलनाचे प्रमुख महेंद्रसिंग टिकैत यांचे चिरंजीव राकेश टिकैत यांचा हरयानी पगडी घालून सिंधू बॉर्डरवर सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात शेवटपर्यंत पाठीशी राहील, अशी ग्वाही शंकरराव गोडसे यांनी दिली.