सातारा : देशातील पहिली सैनिक शाळा असलेल्या सातारा सैनिक स्कूलच्या तब्बल १३ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत निवड झाली असल्याची माहिती शाळेच्या प्राचार्य ग्रुप कॅप्टन उज्ज्वल घोरमाडे यांनी दिली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या जुलै २०२१मध्ये १४६ तुकडीच्या सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी सातारा सैनिक स्कूलमधील शोभित गुप्ता, नितीन शर्मा, आकाश कोकाटे, अभिजीत कदम, गणेश शिंदे, श्रीराम क्षीरसागर, सुशांत जाधव, रोहित कुमार, आर्यन चिखलकर, मोहनीश लाड, प्रतीक पवार, राहुल साबळे, भार्गव बाकळे या तेरा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने या परीक्षा १८ एप्रिल रोजी घेण्यात आल्या होत्या. कोविड काळ सुरू असताना निव्वळ ऑनलाईन मार्गदर्शनाच्याद्वारे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. मुख्याध्यापक विंग कमांडर बी. लक्ष्मीकांत, प्रशासन अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रमोद पाटील, शिक्षक वर्ग आदींनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.