सायगाव : आयएसओ ९००१:२००८ मानांकन मिळविणारे सायगाव आरोग्य केंद्र हे जावळी तालुक्यासाठी आरोग्य क्षेत्रातील एक मानबिंदू ठरलेले आहे. रुग्णांना दिली जाणारी उत्तम सेवा यामुळेच खऱ्या अर्थाने या आरोग्य केंद्राला राज्य शासनाकडून मान मिळाला आहे.दुर्गम दऱ्याखोऱ्याचा जावळी तालुका म्हटले जाते, त्यामुळेच या ठिकाणी आरोग्य विभागांची वानवा असते. सायगाव हे आनेवाडी गटातील एक मुख्य बाजारपेठ मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या सर्व तक्रारींचे या केंद्रात निरसन होतच असते. खासगी वैद्यकीय व्यवसायाला तोंड देत या आरोग्य केंद्राने रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे.आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी असणारे निकष व अटी या केंद्राने पूर्ण केल्याने व यामध्ये सातत्य राखल्याने हा मान मिळाला आहे. यामध्ये केंद्रामार्फत होणारी रुग्णांची तपासणी, त्यांना देण्यात येणारी विविध प्रकारच्या सेवा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, कुटुंब कल्याण कार्यक्रम, एकात्मिक रोग सर्वेक्षण शालेय आरोग्य तपासणी, पल्स पोलिओ कार्यक्रम, लेक वाचवा अभियान, एड्स निर्मूलन कार्यक्रम या सर्वांची रुग्णांपर्यंत माहिती पोचते का? याचा फायदा नागरिकांना मिळतो का? शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होते का? या सर्वांमुळे रुग्ण समाधानी आहेत का? या सर्वांमुळे रुग्ण समाधानी आहेत का, याचेही परीक्षण केले जाते. राज्य शासनाच्या वतीने पाहणी करून या आरोग्य केंद्राला मानांकन दिले आहे.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. सी. वळवी म्हणाले, ‘आरोग्य केंद्राच्या या देदीप्यमान वाटचालीत लोकांचा देखील सहभाग आहे. त्यांच्यामुळे आरोग्य केंद्राचे रुपडे पालटले असून, या ठिकाणी २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. कर्मचारी-अधिकारी यांचे रुग्णांशी, नागरिकांशी असलेले आपुलकीचे नाते यामुळेच आम्ही तत्पर आरोग्य सेवा देत आहोत. (वार्ताहर)
सायगाव आरोग्य केंद्रास मानांकन
By admin | Updated: November 20, 2015 00:07 IST