नागठाणे : ‘सोयाबीन पिकावरील तांबेरा रोगाच्या समूळ नियंत्रणासाठी बियाणे बदल करून तांबेरा प्रतिबंधक वाणाची पेरणी करणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन कृषी सहायक अंकुश सोनावले यांनी केले.
निसराळे येथील सोयाबीन तांबेरा नियंत्रण शिवारफेरी प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कृषिमित्र शेतकरी गटाचे प्रगतशील शेतकरी सचिन घोरपडे, अंकुश घोरपडे, भगवान गायकवाड, सागर घोरपडे, सदाशिव घोरपडे आदी उपस्थित होते.
सोनावले म्हणाले, ‘जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी युवराज काटे, पर्यवेक्षक रोहिदास तिटकारे, अनिल यादव यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांत जागृती करून नागठाणे मंडलमध्ये जवळपास अडीच हजार एकर क्षेत्रावर फुले संगम, फुले किमया या तांबेरा प्रतिबंधक वाणाची टोकन तसेच बीबीएफ पद्धतीने पेरणी केली आहे. त्या ठिकाणी तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. परंतु प्रामुख्याने जे. एस. ३३५ या वाणावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पुढील उन्हाळी किंवा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी फुले संगम, फुले किमया यासारख्या वाणाचीच टोकन किंवा बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी. परंतु सध्याच्या तांबेरा रोगाच्या तत्काळ नियंत्रणासाठी प्रोपीकोन्याझोल पंचवीस टक्के ईसी किंवा डायफेनोकोन्याझोल २५ टक्के ईसी या बुरशीनाशकाची फवारणी करावी. तांबेरा प्रतिबंधासाठी दशपर्णी अर्कासोबत गोमूत्राची फवारणी करावी.