कुडाळ : कोरोनाच्या महाभयंकर आजारामुळे गेल्या मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळांची घंटा आता वाजली आहे. याकरिता गेल्या सात दिवसांपासून जावळीतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पूर्ण झाली असून, पंचायत समिती जावळी आरोग्य आणि शिक्षण विभागाकडून यासाठी योग्य नियोजन केले होते.
यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे निम्म्यापेक्षा जास्त शैक्षणिक वर्ष वाया गेले. टप्प्याटप्प्याने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. तर सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू केले आहेत. यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अध्यापन होत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तालुक्यातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तालुक्यातील मेढा, कुडाळ, सायगाव, बामणोली या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचवी ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पूर्ण झाली आहे.
शासकीय नियमांचे पालन करीत शाळा पूर्वीप्रमाणेच सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होते; परंतु या शिक्षणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात झाली आहे. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत आहे. शाळा व परिसर सॅनिटाईज करण्यात आला असून शिक्षकांनी एसओपीचे पालन कसे करावे, काय सावधगिरी बाळगावी, याची माहिती दिली आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारावर तापमान तपासणारी थर्मल गन, ऑक्सिमीटर अनिवार्य केले असून, विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, पुस्तके एकमेकांना देण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. शालेय परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच पालकांनी लेखी संमती दिल्याखेरीज विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही, असे शिक्षण विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
(कोट)
कोरोना काळात बराच काळ विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित होते. यावेळी ऑनलाईन शिक्षणातून त्यांना प्रवाहात ठेवण्याचे प्रयत्न केले. शाळा सुरू झाली असल्याने सर्व पूर्वतयारी केली आहे. प्रदीर्घ काळानंतर मुले शाळेत आल्याने ज्ञानमंदिराचे नंदनवन फुलून गेले आहे. शिक्षक, विद्यार्थी आनंदी, उत्साही आहेत. सर्व परिस्थिती पूर्वपदावर येऊन लवकरच पहिली ते चौथीपर्यंतचे वर्गही सुरू होतील.
-सुवर्णा साळवी, उपशिक्षिका, सरताळे