सातारा : येथील सह्याद्री ट्रेकिंग या संस्थेने आयोजित केलेल्या कळसूबाई रतनगड-भडारदरा पदभ्रमण मोहिमेस सातारा-सांगली येथील गिर्यारोहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गिर्यारोहक कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या मोहिमेदरम्यान सर्व सहभागी मुला-मुलींनी महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ सर्वोच्च शिखर कळसूबाई सर केले व जल्लोष केला.सह्याद्री ट्रेकिंगतर्फे नुकतीच कळसूबाई रतनगड - रंधा फॉल - भंडारदरा या साहसी मोहिमेचे आयोजन केले होते. विविध शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी झाले होते. यावेळी मुलांना रतनगडावरील थरारक शिड्यांवरून जावू लागले. तसेच कात्रा कडा हा निसर्गाचा चमत्कारही पहायला मिळाला.उंचच उंच डोंगर रांगा खोल खोल दऱ्या घनदाट जंगल, सह्याद्रीची पर्वतरांग, विविध वनस्पती, किटक, किल्ल्यांचा इतिहास यांची परिपूर्ण माहिती देण्यात आली. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सह्याद्री ट्रेकिंगच्या सनी यवतकर, अमीर नदाफ, प्रतिक साळुंखे, अनिकेत कोदे, अभिजित धुमाळ, कल्याण देसाई, मानसी सदामते, अभय देशमुख, उर्वशी पवार, प्रणव महामुनी यांचे विशेष सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
कळसूबाई शिखरावर चिमुकले सातारकर
By admin | Updated: December 10, 2014 23:58 IST