लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : कोकण किनारपट्टीला काही दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा
बसला. त्यामुळे वीज कंपनीचे मोठे नुकसान होऊन
वीजपुरवठाही खंडित झाला. हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी
सातारा जिल्ह्यातील वडूज विभागातील वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे.
तौक्ते चक्रीवादळात कोकण
किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत महावितरण कंपनीचे
नुकसान झाले. ठिकठिकाणी झाडे पडल्याने घरांचे नुकसान झाले. काजू, आंब्याच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या. वीजवाहक खांबही उखडून पडले. अनेक ठिकाणी विद्युतवाहक ताराही तुटल्याने
त्या भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. या भागात वीज कंपनीकडून दुरुस्तीचे काम करण्यासाठी व वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी
वीज कंपनीच्या बारामती मंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे,
साताऱ्याचे अधीक्षक अभियंता एम. गायकवाड, वडूज विभागाचे कार्यकारी
अभियंता सोमनाथ मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हणमंतराव ढोक यांच्या
आदेशानुसार वडूज विभागातील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता ज्ञानेश्वर
करे, प्रधान तंत्रज्ञ सुनील गडकरी, सोमेश्वर सूर्यवंशी, वरिष्ठ तंत्रज्ञ राहुल जाधव, तंत्रज्ञ
ऋषिकेश खुडे, उमेश इंगळे या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक
तेथे काम करीत आहे.
कणकवली विभागातील आचरा बंदर,
रामगड, बुधवळे, पांडलोस, मठबिंदू, लोहरवाडी, नारलवाडी येथे अधिकारी, कर्मचारी सध्या काम करीत आहेत. वीजजोडणीचे सकाळी आठपासून ते रात्री आठपर्यंत तब्बल बारा तास हे सर्वजण काम करीत आहेत. लोकांची विजेची गैरसोय लवकर दूर करण्यासाठी गतीने मदतकार्यास सुरुवात केल्याने या भागातील लोकांना मोठा दिलासा मिळाला.
डोंगराळ व दुर्गम भागांत हे अधिकारी, कर्मचारी सध्या वीज यंत्रणा पूर्ववत
करण्याचे काम युध्दपातळीवर करीत आहेत. विजेचे खांब उभे करणे, वीजवाहक
तारांची जोडणी आदी कामे ही डोंगराळ व दुर्गम भागांत जाऊनच करावी लागत
आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचारीही सकाळी लवकर उठून या मदतकार्याला
सुरुवात करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू असते. स्थानिक
ग्रामस्थांनी डाळ, भात अशी जेवणाची सोय केली आहे.
कोकणातील बहुतांशी भाग हा डोंगराळ व दुर्गम असल्याने अनेक भागांत
मोबाईलचे नेटवर्क येत नाही. त्यामुळे घरच्या मंडळींशीही तब्बल चोवीस तास
संपर्क होऊ शकत नाही. कामानिमित्त एखाद्या डोंगरावर अथवा उंचवट्याच्या
ठिकाणी गेल्यावर मोबाईलला नेटवर्क आल्यानंतरच घरच्यांशी संपर्क
होतो.
चौकट :
तिसऱ्यांदा मदतकार्यात सहभाग....
महावितरणच्या
वडूज विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २०१९ मध्ये कोल्हापूर
जिल्ह्यातील महापूर, गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे मंडणगड येथे व
सध्या तौक्ते चक्रीवादळामुळे कणकवली येथे झालेल्या नुकसानीच्या मदतकार्यात
सहभाग नोंदविला आहे.
कोट :
कोरोना महामारीच्या काळात कुटुंबातील सदस्यांची इकडे येण्यापूर्वी मोठी
नाराजी होती. मात्र सद्य:स्थितीतील तेथील लोकांची गैरसोयविषयी बोलल्यानंतर
नाराजी दूर झाली. 'जनसेवा हीच ईश्वरसेवा' असल्याचे मानून आम्ही सर्वजण
कार्यरत आहोत.
- सुनील गडकरी,
प्रधान तंत्रज्ञ निमसोड शाखा
फोटो ओळी
आचरा बंदर येथे वीजजोडणीचे काम करताना वडूज विभागातील वीज कर्मचारी.