सातारा : सातारा कोषागार निवृत्तिधारकांना व इतर शासकीय कार्यालयांना अद्ययावत व तत्काळ सेवा देत असल्याने कोषागारातील कर्मचारी अधिकारी सन्मानास पात्र आहेत, कोषागार दिनानिमित्त विशेष गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांचा सन्मान करून सातारा कोषागाराने वेगळा ठसा निर्माण केला आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले.
सातारा जिल्हा कोषागारात कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी १ फेब्रुवारी हा लेखा व कोषागार दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी धनाजीराव शिंदे, स्थानिक लेखा निधीचे सहायक संचालक शार्दुल पाटील, सातारा नगर परिषदेच्या मुख्य लेखाधिकारी आरती नांगरे पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निवृत्तिवेतनधारकांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा केंद्राचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोषागार दिनानिमित्त सर्व उपस्थिताना कोषागार दिनाच्या शुभेच्छाही अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिल्या. रक्तदान शिबिराचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेची व पाककला स्पर्धेची मान्यवरांनी पाहणी केली.
कोषागाराकडून नेहमीच नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जातात, असे सांगून जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे यांनी कोषागार दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
नावीन्यपूर्ण योजनेतून "शीघ्र प्रतिसाद कोषागारे" संगणकीयप्रणाली कोषागार कार्यालयात आस्थापित करून जलद व अचूक लोकाभिमुख सेवा देण्याचा मनोदय जिल्हा कोषागार अधिकारी धनाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.
यावेळी कामकाजात विशेष गुणवत्ता दाखवलेल्या मेढा उपकोषागार अधिकारी मंदार जोशी, कनिष्ठ लेखापाल विशाल बन्ने, लेखालिपिक जयकुमार अहिवळे, पांडूरंग भोसले, साईराम कुलकर्णी, सीमा जगदाळे, शीतल लांडगे, प्रवीण कुलकर्णी, अमोल परिट, विश्रांती पाटील, स्वप्नील जगदाळे, नाईक सुभद्रा वायदंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कारोना विषाणूच्या आत्पकालीन परिस्थितीत विशेष काम केलेल्या साताऱ्यातील उपकोषागार अधिकारी कौशल्या लिगाडे, वासंती जांभळे, कोरेगावचे विनोद मोरे, उपलेखापाल मनीषा ननावरे, अनिता मदने, लेखालिपीक भाग्यश्री हेंद्र यांचा कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वित्त व लेखा सेवेत वर्ग १ च्या पदावर निवड झालेल्या स्थानिक निधी लेखा कार्यालयाच्या स्नेहल सांवत व वर्ग २ च्या लेखाधिकारी पदावर निवड झालेल्या प्रविण पाटील यांचादेखील मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद यादव यांनी केले, तर आभार जयकुमार अहिवळे यांनी मानले. कार्यक्रमास अपर कोषागार अधिकारी योगेश करंजेकर, किशोर सपकाळ, सुहास पवार, सहायक लेखाधिकारी शीतल बोबडे यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये निवृत्तिवेतनधारकांच्या सुविधा केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी धनाजीराव शिंदे व इतर उपस्थित होते.