सातारा शहरात कोरोनाने हाहाकार माजवल्यामुळे अनेकजण सातारा शहर सोडून परगावी गेले आहेत. गतवर्षी सातारा शहरात ग्रामीण भागातून लोक येत होते; मात्र यंदा साताऱ्यातून लोक ग्रामीण भागांमध्ये राहण्यासाठी जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा भयानक परिस्थिती असून, कोरोनाचा वाढता मृत्यूदर पाहून अनेकजण हबकून गेले आहेत. जोपर्यंत साताऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत गावीच राहण्याचा अनेकांनी निर्णय घेतला आहे. गतवर्षी मुंबई-पुण्याहून अनेकजण आपल्या मूळ गावी कोरोनाच्या धास्तीने राहण्यासाठी आले होते. मात्र यंदा याउलट परिस्थिती असून, पुण्या-मुंबईचे लोक तेथेच वास्तव्यास आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुण्या-मुंबईहून येणाऱ्या लोकांची संख्या अत्यंत कमी आहे. परंतु साताऱ्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लोकांच्या जिवाशी येत आहे. आपल्या आजूबाजूचे लोक कोरोनाने दगावत असल्याचे माहीत पडत असल्यामुळे लोक आपल्या मूळ गावी जात आहेत.
साताऱ्यामध्ये मूळचे रहिवासी तीस टक्के आहेत. उर्वरित सत्तर टक्के लोक सातारा शहराच्या आजूबाजूचे राहणारे किंवा जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करणारे आहेत. अनेकजण भाड्याने फ्लॅट घेऊन राहत आहेत. गतवर्षीपेक्षा साताऱ्यात यंदा कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढला आहे. घराघरात अख्खी कुटुंबे बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने अनेकजण काही दिवसांसाठी सातारा सोडून गेली आहेत.
आशा स्वयंसेविकांनी दारोदारी शहरात सर्व्हे करायला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांना अनेक घरे बंद असल्याचे दिसून येत आहे. अनेक घरांच्या कुलूपाला वीजबिले अडकवलेली पाहायला मिळत आहेत. सध्या ग्रामीण भागांमध्येही कोरोनाने मोठा शिरकाव केला आहे; मात्र साताऱ्यातील वाढत असणारे आकडे पाहून लोक भीतीने गर्भगळीत झाले आहेत.
चौकट: चोरट्यांना रान मोकळे
एकीकडे कोरोनाच्या धास्तीने लोक सातारा सोडून आपापल्या गावी गेल्याने याचा गैरफायदा घेऊन चोरटे रात्रीच्यासुमारास अशी बंद घरे हेरून चोरी करू शकतात. परिणामी पोलिसांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. लोकांना रस्त्यावर विनाकारण फिरू नका, हे सांगण्यासाठी पोलीस सध्या रस्त्यावर उतरले आहेत, तर आता ही बंद घरे जर चोरट्यांनी फोडण्यास सुरुवात केली, तर पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
चौकट : साताऱ्यात वर्षभरात १४७ जणांचा बळी
सातारा तालुक्यात आतापर्यंत २४ हजार १३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ७४२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा शहरातील ९ हजार १०० रुग्णांचा समावेश असून, वर्षभरात साताऱ्यात १४७ जणांचा कोरोनाने बळी आहे.