सातारा : सातारा पालिकेतील कोरोना विभागप्रमुख प्रणव पवार यांना झालेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणाचे पडसाद बुधवारी पालिकेत उमटले. कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून काम बंद आंदोलन केले. तीन दिवसांत पालिकेचे कामकाज सलग दोन वेळा बंद राहिल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांना अर्वाच्य शब्द वापरल्याच्या निषेधार्थ सोमवारी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्यात आले. याच दिवशी दीपक गाडे नावाचा एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत थेट कोरोना विभागप्रमुख प्रणव पवार यांच्या दालनात आला होता. त्याने कोणतीही विचारपूस न करता पवार यांना दमदाटी व शिवीगाळ सुरू केली. पवार यांनी संबंधित व्यक्तीचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने मोबाईल हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्याशी हुज्जतही घातली. हा सर्व प्रकार दालनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेनंतर प्रणव पवार यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन देऊन या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली. दरम्यान, झालेली घटना निंदनीय असून पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातत्याने शिवीगाळ व दमदाटी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारात वाढ झाली आहे. अशा अपप्रवृत्तींवर अंकुश लावण्याची मागणी करत बुधवारी पालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दैनंदिन कचरा संकलनाचे काम मात्र नेहमीप्रमाणे सुरू होते. त्यात कोणताही खंड पडू दिला नाही.
फोटो : १६ सातारा पालिका
सातारा पालिकेच्या कोरोना विभागप्रमुखांना झालेल्या दमदाटीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. (छाया : जावेद खान)