सातारा : मराठी पत्रकार परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित केलेल्या पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरास जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या तपासणी शिबिरामध्ये २७७ पत्रकारांनी आरोग्य तपासणी करुन घेतली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पत्रकारांच्या तपासणीमध्ये कोणतीही मोठी व्याधी आढळली नसल्याने जिल्ह्याची पत्रकारिता आरोग्यसंपन्न असल्याचेच समोर आले. मराठी पत्रकार परिषदेचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्ह्यातील पत्रकारांचे पहिलेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेतले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, श्रीकांत कात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन शिबीरास प्रारंभ झाला. यावेळी ब्लडप्रेशर, हिमोग्लोबीन, मधुमेह, ईसीजी, त्वचारोग, कान, नाक, घसा, डोळे यासह अनेक शारिरिक तपासण्या मोफत करण्यात आल्या.सूत्रसंचलन डॉ सुधीर बक्षी यांनी केले तर आभार अरुण देशमुख यांनी मानले. यावेळी डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. आर. के. यादव, डॉ. एन. डी. खोत, डॉ. आर.जी. काटकर, डॉ. टी. जी. माने, डॉ. सुभाष घेवारी, डॉ. एस टी कदम, डॉ. उमेश पाटील, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. सी. पी. काटकर, डॉ. अशोक शिंदे आदीसह मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सातारचे पत्रकार एकदम टकाटक!
By admin | Updated: December 9, 2014 23:19 IST