सातारा : येथील समर्थ मंदिर परिसरात मद्यधुंद टँकर चालकाने एकापाठोपाठ एक अशा १५ वाहनांना धडक देऊन सात जणांना जखमी केले. ही खळबळजनक घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. जखमी झालेल्या लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाक्यावरून दुपारी चारच्या सुमारास टँकर भरधाव वेगात समर्थ मंदिर चौकाकडे येत होता. चालकाने भरपूर प्रमाणात मद्यप्राशन केले होते. टँकर चौकात आल्यानंतर त्याचा ताबा सुटला आणि समोर असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांना धडक देतच टँकर पुढे जाऊ लागला. जवळपास १५ वाहनांना त्याने धडक दिली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. भयभीत झालेले अनेक वाहनचालक गाड्या रस्त्यावरच सोडून इतरत्र धावू लागले. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर टँकर चालकाने ब्रेक दाबून टँकर थांबविला. त्यानंतर नागरिकांनी चालकाला केबिनमधून बाहेर काढून रस्त्यावर झोपविले. त्याने जास्त मद्यप्राशन केल्यामुळे तो शुद्धीवरच नव्हता. यात जखमी झालेल्या सात लोकांना तत्काळ जिल्हा शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकर ताब्यात घेतला.
चौकट :
म्हणे तक्रारदार पुढे येईना...
एकापाठोपाठ एक १५ वाहनांना मद्यधुंद टँकर चालकाने उडविल्याने साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली. मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी चालकावर शाहूपुरी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नाही. म्हणे तक्रारदार पुढे येत नसल्याने गुन्हा नोंदविला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.