सातारा : हातात मोबाईल, कानाला हेडफोन आणि पाठीवर सॅक असे चित्र आता गल्लोगल्ली दिसत आहे. सॅकचा शिरकाव इतक्या सहजपणे प्रत्येकाच्या घरात झालाय की त्याविषयी कोणालाच काही वाटत नाही; पण सॅकचा चुकीच्या पद्धतीने होणारा अतिरिक्त वापर पाठदुखीचे मोठे कारण बनू लागला आहे.काही वर्षांपूर्वी महाविद्यालयाची पायरी चढल्यानंतरच सॅक पाठीवर यायची. आता अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांच्या पाठीवरही सॅक आली आहे. त्यामुळे पारंपरिक दप्तर आता अडगळीत आणि आऊट आॅफ फ ॅशन झाले आहे. इंग्रजांची फॅशन म्हणून आपल्याकडे आलेल्या सॅकच्या भारतीय अवतारामुळे पाठीचे आजार वाढू लागले आहेत. या आजार आणि व्याधींना सातारकरही अपवाद नाहीत, हे खेदाने म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सॅक वापरायची असेल तर त्याचे शास्त्रशुद्ध माहिती घेऊन वापर करावा, असा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञ देत आहेत. (प्रतिनिधी)काय आहे योग्य पद्धत?पाठीवर सॅक असेल तर त्याचा पूर्ण भार मणक्यावर येतो. काहीजण सॅक कमरेपर्यंत टांगती पाठीवर अडकवतात. यामुळे पाठीच्या मणक्यावर सर्वाधिक ताण पडतो. त्यामुळे सॅक पाठीवर ठेवताना ती लोंबकळती ठेवायची नाही. पाठीवर फिट्ट सॅक बसली तर सामानाचे ओझे दोन्ही खांद्यावर विभागले जाते, त्यामुळे मणक्यावर ताण पडत नाही.किती सामान बसते?मध्यम आकाराच्या सॅकमध्ये साधारण दोन दिवसांच्या प्रवासाचे कपडे बसू शकतात. विविध कप्पे असल्यामुळे अन्य सामान बसवणेही सोपे शक्य होते. पाण्याची बाटलीही साईडच्या कप्प्यात ठेवता येत असल्याने त्याला अधिक प्राधान्य दिले जाते.वाढती क्रेझ कशासाठी ?बाजारात सध्या सर्व आकार, रंग आणि प्रकारात सॅक उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, दोनशे रुपयांपासून सॅक मिळू शकते. स्थानिक ठिकाणीही सॅक तयार करणारे असल्याने त्याच्या किमती कमी आहेत. पर्यायाने उपलब्धता आणि वैविधता असल्यामुळे सर्वच वयोगटात सॅकचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत दिवेसंदिवस वाढ होत आहे.महाविद्यालयीन युवकांचे हालशहरात येणाऱ्या अनेक महाविद्यालयीन युवकांना रोज काही तासांचा प्रवास करावा लागतो. सकाळी एसटीने प्रवास, त्यानंतर महाविद्यालयापर्यंत चालत जाणे. महाविद्यालय संपल्यानंतर क्लासपर्यंतची पायपीट आणि पुढे एसटीची वाट पाहण्यासाठी होणारी ताटखळ यामुळे या मुलांना सर्वाधिक वेळ जड सॅक आपल्या पाठीवरच ठेवावी लागते. या युवांना पाठीच्या कण्याचा सर्वाधिक त्रास होतो. यासाठी त्यांना शक्य असेल तेव्हा सॅक पाठीवरून काढून ठेवण्याची सवय लावणे गरजेचे आहे.युवतींना त्रास अधिकमहाविद्यालय आणि नोकरीसाठी जाणाऱ्या युवती ज्या सॅकचा वापर करतात, त्यांना त्याचा सर्वाधिक त्रास जाणवतो. बऱ्याचदा मुली सॅक एकाच खांद्यावर अडकवतात, त्यामुळे खांद्याचे आजार उद्भवतात. दुसरीकडे सॅकमध्ये बसेल तेवढे सगळे सामान भरण्याकडे त्यांचा कल असतो, त्यामुळे सॅकचे ओझेही वाढलेले असते. योग्य आहार, व्यायामाचा अभाव आणि बसण्याच्या अयोग्य सवयींमुळे पाठीच्या कण्याचा त्रास युवतींना अधिक जाणवतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सातारकरांच्या पाठीला सोसवेना ‘सॅक’चं ओझं !
By admin | Updated: July 17, 2016 01:05 IST