सातारा : सातारचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती झाली असून, डॉ. अभिनव देशमुख यांची गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तसेच सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांचीही पुणे येथे आयुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी मुंबईहून आर. बी. देशमुख येत आहेत. १९ फेब्रुवारी २०१४ रोजी के. एम. एम. प्रसन्ना यांच्याकडून डॉ. अभिनव देशमुख यांनी पदभार स्वीकारला होता. काही दिवसांतच त्यांनी प्रलंबित असणाऱ्या गुन्ह्यांचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या जिव्हाळ्याच्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला, तर ते स्वत: जातीने घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना करीत होते. त्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही चांगले होते. जिल्ह्यात खुनाचे गुन्हे ६८ दाखल होते. यापैकी ६१ खूनप्रकरणे उघडकीस आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्या टोळ्यांचाही त्यांनी चांगलाच बंदोबस्त केला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली होती. एका वर्षात त्यांनी तब्बल १७ टोळ्या जिल्ह्यातून तडिपार केल्या आहेत. सातारा शहरातील पोलिसांच्या यादीवरील एकही गुंड तडिपारीच्या कारवाईतून सुटला नाही. राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नवख्या बाळू खंदारेलाही त्यांनी तडिपार केले. बोगदा संदीप पाटील सैनिक स्कूलचे विद्यार्थीसंदीप पाटील हे मूळचे वाळवा तालुक्यातील येलूर गावचे आहेत. त्यांचे शिक्षण १९८९ ते १९९६ या कालावधीत सातारा सैनिक स्कूल येथे झाले. पाटील यांनी सहायक पोलिस अधीक्षक चंद्रपूर तसेच पोलिस अधीक्षक परभणी येथे सेवा बजावल्यानंतर त्यांची गडचिरोली येथे बदली झाली होती. ‘आज मी जी पोलिस सेवा बजावतोय त्यात सातारा सैनिक स्कूलचा मोठा वाटा आहे. त्यामुळे साताऱ्यात सेवा बजावताना मला निश्चित आनंद होईल,’ असे सातारचे नवे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. -/वृत्त पान ३ वर
संदीप पाटील नवे पोलिस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2016 01:16 IST