सातारा : शालेय जीवनापासूनच रंग अन् रेषांशी गट्टी जमलेली. पुढे ती एवढी घट्ट झाली की डोळ्यांना भावलेला एखादा क्षण लीलया चित्रबद्ध व्हायचा. कलेचा आविष्कार घेऊनच जन्माला आलेला हा अवलिया कलाकार. तो कधी कुंचल्याने रंगांशी खेळतो, कधी भोपळ्यातून मानवी चेहऱ्याला आकार देतो, कधी संगणकाच्या पडद्यावर रंगांची उधळण करीत चित्रांना जिवंत करतो, तर कधी अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर वाळूच्या ढिगाऱ्यातून सुंदर मंदिर उभे करतो. हृदयात कलेचा जिवंत झरा असलेला असा हा जादूई हातांचा कलाकार म्हणजे वैभव काटवटे.वैभव हा मूळचा साताऱ्याचा. वडील नोकरीनिमित्त मुंबईत असल्याने काटवटे कुटुंब सध्या तेथेच वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच चित्रकलेकडे ओढा असल्याने बारावीनंतर वैभवने अॅनिमेशनचा डिप्लोमा केला. पण कलेच्या प्रातांत नवनवीन कला शिकण्याची आवड असल्याने कृत्रिम रंगांमध्ये त्याचे मन जास्त काळ रमले नाही. सुरुवातील पेन्सिलने चित्र काढता काढता त्याची जागा कुंचल्यानं घेतली. घरी आणलेल्या फळांमधूनही त्याने अप्रतिम कलाकृतींना जन्म दिला. बारकावे, अचूकता यामुळे एक जिवंत कलाकृती बनविण्याचा त्याचा प्रयत्न असतो. डिजिटल पेंटिंग, प्लास्अर आॅफ पॅरिसपासून सेट बनविणे, स्क्लप्चर बनविण्यातही तो माहीर आहे. मात्र, कलेच्या क्षेत्रात जगाच्या कॅनव्हासवर चमकायचे असेल तर ‘वाळू शिल्प’ (सॅण्ड आर्ट) ही कला यायला पाहिजे, असे त्याचे मत आहे. या कलेतही तो स्वप्रयत्नातून पारंगत झाला आहे. वाळूपासून शिल्प बनविण्याचा पहिला अनुभव कथन करताना वैभवने सांगितले की, २०११ मध्ये गोवा येथे ‘सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल’ भरलेला. अनेक नामवंत परदेशी कलाकार सहभागी झालेले. मीही सहभागी होण्यासाठी गेलो, मात्र पूर्वानुभव शून्य असल्यामुळे मला संधी नाकारली. मात्र, नंतर विनंती केल्यामुळे मला एका बाजूला कलाकृती बनविण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी समुद्राच्या राजाचे आठ फूट उंचीचे वाळूशिल्प तयार केले. ही माझी पहिली कलाकृती. हा अनुभव खूप काही शिकवून गेला. त्यानंतर आठ टन वाळूपासून किल्ल्याचे शिल्प तयार केले. त्यातील कोरीव नक्षीकाम, बारकावे आणि अचूकता यामुळे हे शिल्प वाहवा मिळवून गेले. यामुळे प्रोत्साहन मिळाले. सहा दिवस सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत समुद्र किनाऱ्यावर थांबून हे शिल्प तयार केले.‘वालुकाशिल्प’च्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो, त्यासाठी घरीच वाळू आणून विविध कलाकृती बनवित आहे. २०१२ मध्ये ओरिसा येथे झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याठिकाणी ‘त्रिमूर्ती’चं वाळूशिल्प बनविलं. मोठ्या स्पर्धेत सहभागी होता आल्यामुळे आत्मविश्वास आणखीन वाढला आहे. अब्राहम लिंकन, बाळासाहेब ठाकरे, केदारनाथचा महाप्रलय अशा अनेक कलाकृती बनविल्याचे आणि त्यांना पसंती मिळाल्याचे वैभव सांगतो. (प्रतिनिधी)‘विविध कलाप्रकारात अनेकजण माझे अनुकरण करतात; पण तू फळांवर कोरलेल्या कलाकृती माझ्या कलाकृतींच्या जास्त जवळच्या वाटतात,’ ही वालुकाशिल्प व इतर कलाकृतींनी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरलेल्या रे व्हील्फेन या कलावंताने फेसबुकवर दिलेली प्रतिक्रिया खूप मोठी आहे.देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मानसचित्रकला, अॅनिमेशन, चित्रपटाचे सेट बनविणे यातून मी स्वत:चे नाव कमावू शकतो; पण मला कलेच्या प्रांतात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. ‘वाळू शिल्प’ या कला प्रकारात मी देशाचे प्रतिनिधित्व करू शकतो.- वैभव काटवटे
सागरतीरी सातारी जादू : वैभव काटवटेच्या वालुकाशिल्पाला सिद्धहस्त कलावंतांची दाद
By admin | Updated: July 16, 2014 22:54 IST