कडेगाव (जि. सांगली) : सागरेश्वर सहकारी सूतगिरणीच्या कार्डिंग विभागात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत मशिनरी, कापूस, सूत, इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले आहे. आज (सोमवार) दुपारी साडेतीन वाजण्याच्यादरम्यान सूतगिरणीतील कार्डिंग विभागात अचानक आग लागली. सूतगिरणीमधून धुराचे लोट बाहेर पडताना दिसल्याने आग लागल्याचे कामगारांच्या लक्षात आले. कामगारांनी सूतगिरणीमधील फायर सिस्टीम सुरू करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र कापूस आणि सुताने पेट घेतल्याने आग भडकली होती.त्यामुळे कामावरून जाणारे आणि पुढील शिफ्टवर काम करणारे असे सर्व कामगार उपस्थित होते. सर्व कामगारांनी ताकदीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास अडीच तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. सूतगिरणीस आग लागल्याचे समजताच अध्यक्ष शांताराम कदम तातडीने सूतगिरणीवर आले. त्यांनी आग लागलेल्या विभागाची पाहणी केली. मशिनरी, कापूस, सूत, इलेक्ट्रिक साहित्य, फॉल सिलिंग जळाल्याचे दिसले. जळालेले सर्व साहित्य तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. कार्डिंग विभागात लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असून, यामध्ये सूतगिरणीचे जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कदम यांनी सांगितले. (वार्ताहर)
सागरेश्वर सूतगिरणीस आग : तीन कोटींची हानी
By admin | Updated: May 13, 2014 00:37 IST