सातारा : पुणे जिल्ह्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील स्थानिक जनतेला टोल माफी देण्यात यावी, या मागणीसाठी रिपाइं आठवले गटाच्यावतीने गुरुवार, दि. ९ सप्टेंबर रोजी अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली.
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे खेड शिवापूर टोल नाका येथे पुणे जिल्ह्यातील एम एच १२ क्रमांकाच्या वाहनांसाठी टोल माफी देण्यात आली आहे, त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील एम एच ११, एम एच ५० क्रमांकांच्या वाहनांनाही टोलमाफी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही केली गेली नसल्याने आंदोलन करण्याची वेळ आल्याचेही गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे.